मुंबई : जगण्याचा अविभाज्य भाग असतात स्वप्न. खरंतर माणूस स्वप्न पाहत आणि ती पूर्ण करतच मोठा होत असतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ही स्वप्नच आपल्याला पाठबळ देतात, नवी उमेद देतात, काम करण्याची स्फूर्ती देतात असं म्हणायला हरकत नाही.
आयुष्यात या वयात हे हवं, अमुक हवं आणि तमुक हवं असं आपण कित्येकदा बोलतो. पण, सर्वच आपल्याला हवं तसं घडतंच असं नाही.
काही का असेना. पण, जेव्हा ही स्वप्न पूर्ण होतात तेव्हा होणारा आनंद मात्र मौल्यवान असतो.
सध्या असाच आनंद पाहिला आहे अभिनेता अमोल पराशर यानं. विविध वेब सीरिजच्या माध्यमातून अमोल प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अतिशय कमी वयातच त्यानं जीवनात बरंच यश मिळवलं.
ज्यानंतर याचयशाच्या बळावर या अभिनेत्यानं स्वत:चं घरही खरेदी केलं. (Amol parashar )
आईवडिलांनी पाहिलेलं स्वप्न त्यानं साकार केलं आणि हे क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले.
आपलं घरं.... ही भावनाच मुळात अतुलनीय आहे. याच भावनेचा याचीदेही पाहत अमोलनं आईवडिलांचे आनंदी चेहरे सर्वांच्या भेटीला आणले.
त्याची पोस्ट वाचताना नकळत चेहऱ्यावर स्मित आणि डोळ्यांच आनंदाश्रू दाटले.
अमोलनं अनुभवलेला क्षण त्याच्यासाठी जीवनातील काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार यात शंका नाही. तुम्ही असा कोणता क्षण अनुभवला आहे का?