मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय शो 'खिचडी' फेम पुनीत तलरेजाला मारहाण झाल्याची माहिती समोर आलीये. ठाण्यातील दोन व्यक्तींनी ही मारहाण केल्याचं म्हटलं जातयं. खुद्द पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री 34 वर्षीय पुनीत तलरेजा स्कूटरवरून घरी परतत होता. तो आईचं औषध घेण्यासाठी गेला होता. अंबरनाथ परिसरात पोहोचताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. अभिनेत्याला मारहाण केल्यानंतर अनोळखी व्यक्तींनी तिथून पळ काढला.
पुनीत तलरेजावर आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर इतर धारदार शस्त्रांनीही त्याच्यावर वार केले. यानंतर पुनीतने जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला आणि त्याची स्कूटरही तिथेच सोडली. याबाबत अभिनेत्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या सर्व गोष्टी त्याने तिथे लेखी स्वरूपात दिल्या होत्या.
पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत तलरेजाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं आहे. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र हल्लेखोरांचा कोणताही सुगावा हाती लागला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पुनीत तलरेजाने 2002 मध्ये टीव्ही डेब्यू केला होता. 'खिचडी' हा त्याचा पहिला शो होता. यानंतर तो 'बडी दूर से आये है' आणि 'चंद्रकांता'मध्ये दिसला. यानंतर त्याने काही सहाय्यक भूमिका केल्या पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.