मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता अनेकांकडून मानसिक स्वास्थाबाबत मोठी चर्चा होताना दिसते आहे. यादरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) आपल्या खासगी आयुष्याबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. शर्लिनने नैराश्याशी लढण्याबाबत, नैराश्याशी कसा सामना केला, त्यातून बाहेर येण्याबाबतच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
शर्लिनने सांगितलं की, '2005 मध्ये माझ्या वडिलांचं कार्डियक अटॅकने निधन झालं. ते डॉक्टर होते. ज्यावेळी मी माझ्या वडिलांना गमावलं. त्यावेळी मी कॉलेजमध्ये होती. आई-वडिलांशिवाय कसं राहायचं हे मला माहित नव्हतं.'
'काही वर्षांनी मला जाणवलं की, एखाद्या व्यक्तीमध्ये स्वत:ची किंमत किंवा स्वत:बाबतचं प्रेम बाहेरुन निर्माण होत नाही, तर स्वत:शीच बोलून ते आपण मिळवू शकतो. हळू-हळू मी स्वत:वर प्रेम करु लागली. त्यानंतर मला जाणवू लागलं की, जगात वाईट लोक आहेत, परंतु ही जागा वाईट नाही. ही अतिशय सुंदर जागा असल्याचं' शर्लिन म्हणाली.
दोन वर्षांपूर्वी मी धुम्रपान सोडलं. त्यानंतर मी दररोज वर्कआऊट करण्याचा निर्णय घेतला आणि स्वस्थ जीवन जगण्यास सुरुवात केल्याचं शर्लिन म्हणाली.
शर्लिन चोप्राने प्रवासी मजूरांच्याही मानसिक स्वास्थाबाबत चिंता जाहीर केली आहे. तिने प्रवासी मजुरांना आराम आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करावी, अशी विनंतीही केली आहे. मानसिक स्वास्थाबाबतचे महत्त्व, जागरुकता निर्माण करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही सुरु करावेत, जेणेकरुन मानसिकदृष्ट्या विचलित झालेल्या लोकांची मदत केली जाऊ शकते, असंही ती म्हणाली.