'मी तंबाखूची नाही, वेलचीची जाहिरात करतो' - अजय देवगण

समाजावर नकारात्मकरित्या प्रभाव पाडणाऱ्या कोणत्याही गोष्टींची जाहिरात करत नाही

Updated: May 15, 2019, 10:49 AM IST
 'मी तंबाखूची नाही, वेलचीची जाहिरात करतो' - अजय देवगण  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने मंगळवारी सांगितले की, समाजावर नकारात्मकरित्या प्रभाव पाडणाऱ्या कोणत्याही गोष्टींची जाहिरात न करण्याचा मी प्रयत्न करतो. मी तंबाखूची नाही तर वेलचीची जाहीरात करत असल्याचे त्याने म्हटलंय. एका कॅन्सर पीडित व्यक्तीने अजयला तंबाखूची जाहिरात न करण्याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर अजयने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजयने 'पीटीआय'शी बोलताना सांगितलं की, मी त्या व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि मी माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तंबाखूचा प्रचार न करण्याचं सांगितलं आहे.

'मी नेहमी माझ्या कॉन्ट्रेक्टमध्ये तंबाखूचा प्रचार न करण्याचं सांगतिलं आहे. ती जाहिरात वेलचीची आहे आणि माझ्या कॉन्ट्रेक्टमध्ये यात तंबाखू नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हीच कंपनी जर दुसरी कोणतीही गोष्ट विकत असेल तर मला माहिती नाही काय करायला हवं. यापेक्षा अधिक म्हणजे मी माझ्या चित्रपटांत कोणत्याही कारणाशिवाय धुम्रपान करणार नाही हे एकच करु शकतो' असं त्यांने म्हटलंय.

राजस्थानमधील कॅन्सर पीडित नानकराम (४०) यांनी सार्वजनिकरित्या अजयला समाजहितासाठी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात न करण्याचं आवाहन केलं होतं. कर्करोगाशी झुंज देणारे नानकराम हे अजयचे चाहते आहेत. त्यामुळे अजय जाहिरात करत असलेल्या सर्व गोष्टी ते वापरतात. परंतु आता तंबाखूच्या वाईट सवयींचे परिणाम त्यांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे त्यांनी अजयला अशा प्रकारच्या पदार्थांची जाहिरात न करण्याचं सांगितलं होतं.