Tanhaji Marathi Trailer : 'तयारी करा पंत....', महाराजांचा आदेश

'तान्हाजी' चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Updated: Dec 10, 2019, 07:29 PM IST
Tanhaji Marathi Trailer : 'तयारी करा पंत....', महाराजांचा आदेश
Tanhaji The Unsung Warrior तान्हाजी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर मावळ्यांच्या साथीने आणि अद्वितीय पराक्रमाने स्वराज्याचा विस्तार केला. हा विस्तार करत असताना त्यांच्या वाटेत काही अडथळेही आले, आव्हानं आली. पण, प्रत्येक आव्हानांचा त्यांनी तितक्याच धीराने सामना केला. यामध्ये महाजराजांना साथ मिळाली ती म्हणजे त्यांच्या मावळ्यांची. 

प्रचंड आत्मविश्वास आणि स्वराज्याप्रती एकनिष्ठ वृत्ती असणाऱ्या अशाच एका स्वराज्याच्या शिलेदाराच्या म्हणजेच सुभेदजार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर', या चित्रपटातून दिग्दर्शक ओम राऊतने हा चित्रपट साकारण्याचं शिवधनुष्य पेललं आहे.

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यामागोमाग आता चित्रपटाचा मराठी ट्रेलरही सर्वांच्या भेटीला आला आहे. 'तयारी करा पंत...' असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. अजय देवगन, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे, सैफ अली खान, अजिंक्य देव अशा अनेक कलाकारांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 

हिंदी ट्रेलरशी अगदीच मिळताजुळता असा हा ट्रेलर असून, त्याच भाषा वगळता फार बदल केलेले नाहीत. एकंदरच चित्रपटाला असणारा स्वराज्यप्रेमी मराठमोळा प्रेक्षकवर्ग पाहता दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी उचललेलं हे पाऊल कमाईच्या बाबतीच फायद्याचं ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. १० जानेवारीला 'तान्हाजी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं एकंदर कथानक, साहसदृश्यं आणि कलाकारांची फौज पाहता कलाविश्वाच्याही नजरा चित्रपटावरच खिळल्याचं कळत आहे.