मुंबई : अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. अक्षराच्या पाटणा येथील निवासस्थानी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी नोटीस चिकटवली आहे. या प्रकरणी अक्षरा सिंहच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. हे संपूर्ण प्रकरण 2021 मध्ये वैशालीचे माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमाशी संबंधित आहे.
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहला नोव्हेंबर २०२१ मध्ये माजी आमदार आणि बाहुबली मुन्ना शुक्ला यांच्या घरी तिच्या पुतण्याच्या उपनयन विधीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यान अक्षरा सिंहच्या स्टेज शोदरम्यान झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर वैशाली पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे माजी आमदार मुन्ना शुक्ला, त्यांची पत्नी अनु शुक्ला, अंगरक्षक आणि भोजपुरी चित्रपट अभिनेत्री अक्षरा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात इतर सर्वांनी जामीन घेतला, मात्र अक्षरा सिंहने जामीन घेतला नाही. यानंतर गुरुवारी पोलीस पाटणा येथील कंकरबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. अभिनेत्री अक्षरा सिंग वेळेत कोर्टात हजर न राहिल्यास अभिनेत्रीच्या अडचणी वाढू शकतात, असे बोलले जात आहे.
अक्षरा सिंहचा भाबुआमध्ये आयोजित केलेला कार्यक्रम नुकताच चर्चेत होता. छठ दरम्यान आयोजित कार्यक्रमात तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लोक अनियंत्रित झाल्यावर पोलिसांना लाठीमार करावा लागला. पळून जाताना दोन-चार जणांना किरकोळ दुखापतही झाली होती.