जगदंब! 'स्वराज्यरक्षक संभाजी' घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुख्य भूमिका साकारणारे अमोल कोल्हे भावूक 

Updated: Feb 6, 2020, 07:13 PM IST
जगदंब! 'स्वराज्यरक्षक संभाजी' घेणार प्रेक्षकांचा निरोप title=
स्वराज्यरक्षक संभाजी

मुंबई : काही पात्र ही अमुक एका व्यक्तीसाठीच साकारण्याच येतात, याचं उदाहरण आजवर अनेकदा कलाजगतातून मिळालं आहे. यातीलच एक उदाहरण म्हणजे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका.

स्वराज्यासाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिवसरात्र एक करत मुहूर्तमेढ रोवली, त्याचप्रमाणे ही परंपरा पुढे सुरु ठेवत परकीयांच्या नजरेपासून स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी हा वारसा पुढे चालवला. 

आजवर विविध बखरींमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखांमधून आणि इतिहासकारांच्या रचनात्मक मांडणीतून संभाजी महाराज आणि त्याचं कर्तृत्त्व उलगडलं आहे. अभिमान, उत्सुकता आणि साहसाच्या बळावर सुरु झालेला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा प्रवास हा प्रत्येक चाहत्याच्या मनावर राज्य करणारा. 

डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्या आत्मियतेने हा प्रवास घराघरात पोहोचवला तोच प्रवास आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. खुद्द अमोल कोल्हे यांनीच एक व्हिडिओ पोस्ट करत याचे संकेत दिले आहेत. 'एक प्रवास कधीच न विसरता येणारा....' असं कॅप्शन देत त्यांनी एक व्हिडिो पोस्ट केला आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिोमध्ये ते संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी तयार होताना दिसत आहेत. पण, त्यांच्या चेहऱ्यावर असणारे भाव आणि ऐकू येणारे शब्द हे मनात कालवाकालव करणारे ठरत आहेत. 'सुरु झालेला प्रत्येक प्रवास कधी ना कधी संपणार हे निश्चितच... काही प्रवास मात्र खूप काही देऊन जातात. खूप काही शिकवतात.... कर्तव्यपूर्तीची अनुभूती देतात...... स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात..... जणूकाही आयुष्यभराची शिदोरी देतात.....असाच एक प्रवास.....', या शब्दांत त्यांनी मालिकेचं वर्णन केलं आहे. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

मनाच्या अतिशय जवळच्या मालिकेत या टप्प्यावर आल्यानंतर एका वेगळ्याच नात्याची अनुभूती कोल्हे यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओतून होत आहे. दरम्यान, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली त्यांची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरीरी, ती प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी घर करुन असेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.