कमाल! भारतीय सिनेमात पहिल्यांदा मराठी माणसानेच साकारलेला डबलरोल, दादासाहेब फाळकेंनी दिली होती संधी

Indian Cinema History: भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ एका मराठी माणसाने रोवली आहे. त्याचबरोबर आणखी एका मराठी माणसाने भारतीय सिनेमासाठी योगदान दिले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 10, 2023, 02:41 PM IST
कमाल! भारतीय सिनेमात पहिल्यांदा मराठी माणसानेच साकारलेला डबलरोल, दादासाहेब फाळकेंनी दिली होती संधी title=
anna salunke first indian actor to play double role in lanka dahan marathi movie of dadasaheb phalke

Indian Cinema History: भारतीय सिनेमाचा इतिहास हा खूपच रंजक आहे. 1913 साली एका मराठी माणसाने भारतात सिनेमाचा पाया रोवला. भारतातील पहिला चित्रपट हा राजा हरिश्चंद्र असून तो एक मूकपट होता. राजा हरिश्चंद्र सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते दादासाहेब फाळके हे होते. तर, चित्रपटात राणी तारामतीची भूमिका अण्णा साळुंखे यांनी साकारली होती. आज आपण अण्णा साळुंखे यांच्याबद्दल काही भन्नाट गोष्टी जाणून घेणार आहोत. यामुळं तुम्हालाही मराठी असल्याचा नक्कीच अभिमान वाटेल. 

अण्णा साळुंखे यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटात राणी तारामती यांची भूमिका साकारली होती. अण्णा मुंबईतील एका रेस्तराँमध्ये कुक आणि वेटर म्हणून काम करत होते. दादासाहेब फाळके यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. साळुंखे यांच्याबाबत एक खास बाब म्हणजे त्यांनी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा डबल रोल साकारला होता. राम आणि सीता या दोघांच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. भारतीय सिनेमाच्या इतिहासात डबररोल साकारणारे ते पहिले अभिनेते होते. 

अण्णा साळुंखे ज्या रेस्तराँमध्ये काम करत होते तिथे नेहमीच दादासाहेब फाळके जात असतं. जेव्हा त्यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी महिला कलाकार सापडली नाही तेव्हा अण्णा साळुंखे यांनी स्त्रीभूमिका साकारण्यास होकार दिला. अण्णा साळुंखे हे शरीराने बारीक होते त्यामुळं दादासाहेब फाळके यांनी त्यांना चित्रपटात काम करण्यास सुचवले. तेव्हा अण्णा साळुंखे हॉटेलात महिना 10 रुपये पगारावर काम करत होते. पण फाळकेंनी त्यांना महिन्याला 15 रुपये पगार देण्याचा वायदा दिला आणि ते भारतातील पहिल्या चित्रपटातील अभिनेत्री झाले. चित्रपटात स्त्री भूमिका साकारणारेही ते पहिलेच कलाकार होते. 

राजा हरिश्चंद्रनंतर अण्णा साळुंखे यांच्या नावावर  आणखी एक इतिहास रचला आहे. त्यांनी आजपर्यंत 106 चित्रपटात काम केले. मात्र, 1917 साली आलेल्या लंकादहन या चित्रपटात त्यांनी राम (हिरो) आणि सीता (हिरोइन) ही दोन्ही पात्रे साकारली होती. चित्रपटात डबलरोल साकारणारे ते पहिले कलाकार ठरले. 

अण्णा साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणूनही काम केले आहे. 1922मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यनारायण आणि 1923मध्ये आलेल्या बुद्धदेवमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. कालांतराने साळुंखे यांनी अभिनयाचे क्षेत्र सोडून पूर्णपणे सिनेमॅटोग्राफीवर लक्ष्य केंद्रीत केले होते. त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही त्यांचे नशीब आजमवले होते. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट 1931मध्ये प्रदर्शित झाला होता. 

27व्या वर्षी निधन 

अण्णा साळुंखे यांनी 1913 ते 1931 या त्यांच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले. यात महिला भूमिका असलेले पाच चित्रपट होते. एका रिपोर्टनुसार, त्यांचे वयाच्या 27व्या वर्षीच निधन झाले.