मुंबई : आई भवानी, महाराज, कोंढाणा, स्वराज्य असे शब्द कानी पडले की, आपोआपच अभिमान वाटतो, वेगळंच धाडस अंगी संचारतं. जणूकाही आपण एका ऐतिहासिक काळातच जातो. याचीच प्रचिती आली, 'तान्हाजी' या चित्रपटातून. ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
पाहता पाहता या चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याचाच गाजावाजा पाहायला मिळाला. दोनशे कोटींच्या कमाईच्या आकड्याजवळ पोहोचणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांचा अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. सोबतच प्रत्येक पात्राने अशी काही छाप प्रेक्षकांवर सोडली की सर्वत्र 'तान्हाजी'चेच वारे वाहू लागले.
चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या यशाचं श्रेय जितकं पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांना दिलं जातं, तितकंच किंबहुना त्याहून कैक पटींनी जास्त श्रेय हे पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना दिलं जातं. त्याच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे, आशिष पाथोडे. 'तान्हाजी'चं कथानक आणि या चित्रपटातील काळ पाहता त्या अनुशंगाने कलाकारांची भाषा, ते साकारणारी पात्रं, त्यांचा अभिनय, त्यांचा पडद्यावरील वावर या साऱ्यातील बारकावे टीपण्यासाठी आशिषने मेहनत घेतली.
मुळचा चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील बोथली या गावातील असणाऱ्या आशिषने चित्रपटातील मराठी भाषा आणि कलाकारांचा एकंदर मराठमोळा बाज यावर मेहनत घेतली. ज्या आधारे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरला. आशिषचा एका गावातून थेट बॉलिवूडपर्यंतचा प्रवास पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. 'ठाकरे', 'अजहर' आणि इतरही काही चित्रपटांमधून आशिष प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'ई टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या या अनुभवाचं कथन केलं होतं. 'मी अजय सर, काजोल मॅम, शरद केळकर आणि नेहा शर्मा यांना अभिनय आणि भाषेतील उच्चारशुद्धतेसाठीचं प्रशिक्षण दिलं होतं. त्यांना प्रशिक्षण देताना मीसुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकलो. इतके मोठे कलाकार असूनही मी काय सांगतो यावर त्यांनी पूर्ण लक्ष दिलं. या कलाकारांची धाडसी वृत्ती दाद देण्याजोगी आहे', असं तो म्हणाला होता. चित्रपटासाठी आशिषचं हेच योगदान त्याचं वेगळेपण सिद्ध करत असून, त्याचीही सर्व स्तरांतून प्रशंसा केली जात आहे.