खऱ्याखुऱ्या धनंजय मानेंचं घर अखेर सापडलं; नावाच्या पाटीसोबतच घरमालकांचा फोटो व्हायरल

Ashok Saraf : मराठी कलाजगतामध्ये काही कलाकारंनी साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या मनातच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातही स्थान मिळवून गेली. धनंजय माने हे त्यातलंच एक पात्र...   

सायली पाटील | Updated: Jun 25, 2024, 10:10 AM IST
खऱ्याखुऱ्या धनंजय मानेंचं घर अखेर सापडलं; नावाच्या पाटीसोबतच घरमालकांचा फोटो व्हायरल   title=
Ashok Saraf home name plate grabs attention as sunil barve shares a photo

Ashok Saraf : 'सदर कलाकृतीमध्ये दाखवण्यात आलेली पात्र पूर्णपणे काल्पनिक असून, त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी कोणताही संबंध नाही' ही अशी ओळ अनेक कलाकृतींच्या सुरुवातीला पाहायला मिळते. थोडक्यात कलाकृतीमध्ये दाखवण्यात आलेल्या बहुतांश गोष्टी काल्पनिक असल्याचीच आठवण इथं दिग्दर्शक करून देत असतो. असंच एक काल्पनिक पात्र प्रेक्षकांच्या मनाचा विशेष ठाव घेऊन गेलं होतं. 

हे पात्र होतं धनंजय माने... 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात अशोक सराफ यांनी साकारलेले धनंजय माने कैक पिढ्यांच्या आवडीचे. बरं, धनंजय माने यांचा पत्ता शोधत येणारा त्यांचा मित्र परशुरामसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकून गेला होता. 'धनंजय माने इथेच राहतात का...?' असं विचारत काहीसा गोंधळलेला परशुराम म्हणजेच ही भूमिका साकारणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनासुद्धा प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. एका क्षणात हास्यकल्लोळ करणाऱ्या या कलाकारांनी खऱ्या अर्थानं जीवंत केलेल्या या पात्रांना चित्रपटापलीकडेही स्थान मिळालं. 

दैनंदिन आयुष्य असो किंवा सोशल मीडिया पोस्ट असो, धनंजय मानेंचा उल्लेख तर सर्रास झाला. तुम्हाला माहितीये का, आता म्हणजे प्रत्यक्षातच या व्यक्तीचं घर सापडलं आहे. तेसुद्धा 'धनंजय माने इथेच राहतात...' असं लिहिलेल्या पाटीसह. 

कुठे राहतात प्रत्यक्षातील धनंजय माने? 

प्रत्यक्ष जीवनात धनंजय माने कोण? ते नेमके कुठे राहतात... याविषयीचा खुलासा एका बोलक्या फोटोसह अभिनेता- दिग्दर्शक सुनील बर्वे यानंच केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमामातून त्यानं मानेंच्या घराचा पाटीसह दिसणारा एक फोटो शेअर केला. 'काल एकदा खात्रीच करून घेतली!! ते नक्की इथेच रहातात!' असं कॅप्शन लिहीत त्यानं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली आणि साक्षात धनंजय मानेही जगासमोर आले. 

हेसुद्धा वाचा : व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो 'राम सेतू'... समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunil Barve (@sunilbarve)

हे माने दुसरेतिसरे कोणी नसून, ते आहेत खुद्द ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. हे खरंय... ज्या भूमिकेनं प्रसिद्धी दिली, ज्या भूमिकेनं जनमानसात स्थान मिळवून दिलं त्या भूमिकेला इतकी सुरेख जागा देत अशोक सराफ यांनी चाहत्यांची मनंही जिंकली आणि अनोख्या प्रकारे कृतज्ञताही व्यक्त केली. 
'धनंजय माने इथेच राहतात... 
श्री. अशोक सराफ
(द वरजिनल हास्यसम्राट)'
असं या ज्येष्ठ अभिनेत्याच्या घराच्या पाटीवर लिहिण्यात आलं असून, सुनीर बर्वेनं शेअर केलेला फोटो पाहताना चाहत्यांना कमालीचा आनंद होत आहे. हा आनंद आहे, प्रत्यक्षातील धनंजय माने यांच्या नावाची पाटी पाहिल्याचा... नाही का!!!