...असं झालं होतं 'तुम्बाड'चं चित्रीकरण

विश्वासही बसणार नाही   

Updated: Jun 9, 2020, 07:41 PM IST
...असं झालं होतं 'तुम्बाड'चं चित्रीकरण title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतीय कलाविश्वात आजवर बऱ्याच विषयांना तितक्याच समर्पकतेनं आणि प्रभावीपणाने हाताळत काही अद्वितीय कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. यापैकी काही कलाकृती प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेल्या. असाच एक चित्रपट म्हणजे, 'तुम्बाड' #tumbbad . 

एक रहस्यकथा या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला आली. सोबतच आले ते म्हणजे काही अफलातून कलाकार. या कलाकारांपैकीच एक नाव म्हणजे अभिनेता सोहम शाह याचं. 'तुम्बाड' नामक एका काल्पनिक गावाभोवती फिरणाऱ्या कथानकाच्या या चित्रपटानं सोहमला एक वेगळी ओळख दिली.

चित्रपटाचं एकंदर कथानक पाहता त्या अनुशंगानं चित्रीकरण करण्यासाठीच्या प्रक्रियेत बऱ्याच अडचणी आल्या होत्या. सोशल मीडियावर या चित्रपटाची एकाएकी चर्चा सुरु झाली आहे. चित्रीकरणात येणाऱ्या एकंदर अडचणी पाहता, 'तुम्बाड' साकारण्यासाठी जवळपास ६ वर्षांचा कालावधी लागला होता. 

'तुम्बाड' हे एक काल्पनिक गाव असलं तरीही, तेथे सतत पाऊस सुरु असतो असं दाखवण्यात आलं आहे. परिणामी चित्रपटातील बहुतांश दृश्यांचं चित्रीकरण खऱ्याखुऱ्या पावसात करण्यात आलं होतं. 

 

कृत्रिम पावसाचा वापर करत चित्रपट फार कमी वेळात चित्रीत करणं सहज शक्य होतं. पण, कथानकाच्या अनुशंगानं मात्र ही घडी नीट बसत नव्हती. तब्बल चार पावसाळे गेले तेव्हा कुठं 'तुम्बाड'चं चित्रीकरण पूर्ण झालं. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाने प्रेक्षकांची भेट घेतली. दिवसागणिक 'तुम्बाड'ची लोकप्रियता वाढतच गेली. तुम्ही पाहिला की नाही हा रहस्यपट?