मुंबई : आव्हानात्मक भूमिकांची निवड करत त्या तितक्याच कातदीने साकारण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता शाहिद कपूर सध्या चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. 'कबीर सिंग' या चित्रपटातील अभिनयामुळे शाहिदची सर्वच स्तरांतून प्रशंसा करण्यात येत आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असूनही कमाईचे आकडे मात्र वेगळंच चित्र सर्वांसमोर ठेवत आहेत.
'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'मध्ये शाहिद मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. कियारा अडवाणी त्याच्यासोबत चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे मोठ्या वेगाने पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
शाहिद कपूरच्या करिअरला वेगळीच कलाटणी देणाऱ्या कबीर सिंगला फक्त आठवड्याच्या शेवटीच नव्हे तर, आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच ऐन व्यग्र वेळापत्रकाच्या दिवसांमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. कबीर सिंगची एकंदर कामगिरी पाहता परिस्थिती कायम राहिल्या पाचव्या दिवशी कमाईचे आकडे शंभर कोटींचा आकडा गाठतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
#KabirSingh is rewriting the rules of the game... Does remarkable biz on Day 4 [working day]... Will hit cr today [Day 5]... #KabirSingh is trending better than *all* biggies released this year: #Bharat, #Kesari, #TotalDhamaal and #GullyBoy... Amazing!
— taran adarsh (@taran_adarsh) June 25, 2019
'भारत', 'केसरी', 'टोटल धमाल' आणि 'गली बॉय' या चित्रपटांच्या तुलनेत कबीर सिंगची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रेमाची ही उध्वस्त कहाणी बॉक्स ऑफिसवर गाजत आहे, असंच म्हणावं लागेल.