मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी आणि आपल्या रुपानं सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री समीरा रेड्डी ही फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जात होती. पुढे लग्न झाल्यानंतर तिनं कुटुंबावर लक्ष देत मोठ्या पडद्यापासून दुरावा पत्करला. मुलांच्या जन्मानंतर तर समीरा फारच व्यग्र दिसू लागली. त्यांना जास्तीत जास्त वेळ देऊ लागली.
या साऱ्यामध्ये समीराचं स्वत:कडे दुर्लक्ष झालं. कामाचा व्याप आणि त्यातही खाण्याच्या बदललेल्या सवयी या साऱ्यामुळे तिचं वजन प्रचंड वाढलं.
वजनाचा आकडा नव्वदी ओलांडून पुढे गेला आणि तिथं तिला खडबडून जाग आली.
प्रत्येकासाठी एक असा प्रसंग येतोच, जेव्हा आपण झोपेतून धाडकन उठावं तसं जागे होतो. समीराचंही तसंच झालं होतं.
वजन कमी करण्याची तुम्हा आम्हा सर्वांचीच इच्छा. मुळात वजन वाढलंय यामुळे कपाळाला हात मारणारे आपणही आहोत. वजन कमी करायचंही आहे, पण त्यासाठीच्या प्रक्रियेत एकाग्रता राखता येत नाही ही मात्र मोठी समस्या.
याच समस्येवर समीरानं अगदी सोप्या पद्धतीने तोडगा काढला. आपल्या 'फॅट टू फिट' या प्रवासामध्ये तिने सर्वांसमोर आणला.
काय म्हणाली समीरा ?
सोशल मीडियावर पोस्ट लिहित समीरानं आपण हा प्रवास वर्षभरापूर्वी सुरु केल्याचं सांगितलं.
'वजन कमी करण्यापेक्षाही आपण सुदृढ कसे राहू, याकडे मी पूर्ण लक्ष दिलं', अस समीराने स्पष्ट केलं.
अनेकदा एकाग्रता भरकटली, पण पुन्हा ती मार्गावरही आली. दरम्यानच्या काळातील उपवासाच्या सवयींमुळे रात्री अपरात्रीच्या खाण्याच्या सवयीही बदलल्या.
नकारात्मक भावनांपासून दूर ठेवण्यासाठी तिनं प्रयत्न केले. शरीराला आणि मनाला शक्य तितकं आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला.
वस्तुस्थिती लक्षात ठेवत ध्येयनिश्चीती करण्यावर समीरानं भर दिला आणि हाच कानमंत्र सर्वांना दिला. वजन कमी करण्याच्या या प्रवासामध्ये एखादा खेळ निवडणं कधीही आनंद देणारं ठरेल ही मजेशीर टीपही तिनं दिली.
वजन कमी करण्यासाठी वेळ देणं कधीही महत्त्वाचं असेल. ही गोष्ट कधीही एका क्षणात होणारी नाही, असंही समीरानं तिच्या पोस्टमधून स्पष्ट केलं.
तेव्हा तुम्हीही खरंच वजन कमी करण्याच्या बेतात असाल, तर समीराचा हा कानमंत्र तुमच्याही फायद्याच्या ठरेल.