Rishabh Pant Advertisment : एरवी क्रिकेटपटू ऋषभ पंत हा एकतर त्याच्या खेळीमुळं किंवा मग अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यामुळं चर्चेत येतो. यावेळी मात्र तो चर्चेत येण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पंत इतका वाईटपणे अडकला आहे, की नकळतच त्याच्याकडून घडलेली चूक अनेकांचाच रोष ओढावताना दिसत आहे. अगदी कलाजगतही त्याच्यावर निशाणा साधण्यात मागे नाही.
निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी नुकतंच एक ट्विट केलं, जिथं त्यांनी ऋषभ पंत आणि त्यानं काम केलेल्या जाहिरातीविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली. शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी घेत Dream 11 च्या जाहिरातीमधून या कलेचीच अवहेलना केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा सर्व प्रकार घृणास्पद आणि अपमानास्पद असल्याचं सांगत त्यांनी ट्वीट केलं. (Bollywood Director Hansal Mehta Slams Rishabh Pant For Advertisment demands Ban)
'हे अतिशय घृणास्पद आणि अवहेलनाजनक आहे. स्वत:ची खिल्ली उडवा पण, कला आणि समृद्ध परंपरांचा असा हशा करु नका. ड्रीम 11 नं ही जाहिरात मागे घ्यावी अशी मी मागणी करतो', असं ट्विट त्यांनी केलं. मेहता यांनी केलेल्या या ट्विटवरही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
सहसा ऋषभ पंतला नेटकऱ्यांचं आणि क्रिकेटप्रेमींचं प्रेम मिळताना दिसतं. पण, यावेळी मात्र तो चुकला असंच अनेकांचं म्हणणं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक अशा मर्यादा ओलांडल्या जातात ज्यांची बऱ्याचदा गरजही नसते. ही जाहिरात तुम्हालाही त्याच गटातली वाटतेय का?
This is a disgusting and disrespectful commercial. Pimp yourself but not at the cost of ridiculing art and it’s rich traditions. I demand that @Dream11 pulls this down. pic.twitter.com/a9KIs23heL
— Hansal Mehta (@mehtahansal) December 10, 2022
ऋषभ पंत आणि ड्रीम 11 ला धारेवर धरणारे हंसल मेहता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. 'शाहिद' आणि 'अलिगढ' या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. येत्या काळात ते करीना कपूरची मध्यवर्ती भूमिका असणारा एक थरारपट साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.