ब्रेकअपमुळे नेहा कक्कडच्या भावनांचा बांध फुटला अन्....

कलाविश्वात एकिकडे लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत असताना काही नात्यांमध्ये मात्र वादळ आल्याचं कळत आहे. 

Updated: Dec 17, 2018, 09:09 AM IST
ब्रेकअपमुळे नेहा कक्कडच्या भावनांचा बांध फुटला अन्....

मुंबई  : कलाविश्वात एकिकडे लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत असताना काही नात्यांमध्ये मात्र वादळ आल्याचं कळत आहे. लोकप्रिय गायिका नेहा कक्कड आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्या नात्यामध्ये सध्या असंच एक वादळ आलं असून, या दोघांनीही आपल्या नात्याला पूर्मविराम दिल्याचं कळत आहे. सोशल मीडिया आणि कलावर्तुळात लोकप्रिय असणाऱ्या नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीच्या काही पोस्ट केल्याचंही पाहायला मिळालं. 

इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून नेहाने हिमांशसोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्याची कल्पना सर्वांना दिली. 'मला माहित आहे, की मी एक सेलिब्रिटी आहे आणि असं काहीतरी लिहिणं माझ्याकडून अपेक्षित नाही. पण शेवटी मीसुद्धा एक व्यक्तीच आहे. आज खूप जास्त दु:ख होत असल्यामुळे अखेर मी भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. आम्हा सेलिब्रिटींचे दोन चेहरे असतात. एक अतिशय व्यक्तीगत आयुष्याचा आणि दुसरा जो इतरांना दिसतो, पडद्यावर झळकतो. खासगी आयुष्यात कितीही वादळं येवो, पण, सर्वांसमोर मात्र आम्हाला नेहमीच हसऱ्या चेहऱ्यानेच वावरावं लागतं. यावेळी इथे व्यक्तीगत आयुष्यातील दु:खाला वाव नसतो', असं तिने एका स्टोरीत लिहिलं. 

आपण लिहित असलेल्या पोस्टविषयी किंवा एकंदरच या परिस्थितीविषयी आता खूप काही बोललं जाणार याची कल्पना असल्याचंही तिने स्पष्ट केलं. पण, हे सारं ऐकून घेण्याची आता मला सवय झाली असल्याचं म्हणत तिने आपलं दु:ख व्यक्त केलं. 

कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान नेहाच्या दु:खाचा बांध फुटला..

खासगी आयुष्यात सध्याच्या घडीला प्रेमभंग आणि निराशा या साऱ्याचा सामना करणाऱ्या नेहाने 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या नेहाला हे वळण मात्र तितकच आव्हानात्मक वाटत आहे हेसुद्धा तितकच खरं. कारण, सूत्रांचा हवाला देत DBpost.comने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या रिअॅलिटी शोच्या एका भागामध्ये स्पर्धकाने रोमँटीक गाणं सादर करताच तिच्या डोळ्यांतून आसवं घरंगळली. किंबहुना शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचल्यापासूनच नेहा अगदी शांत होती. नेहमी आनंदी वातावरणात असणारी आणि सेटवर गडबड करणारी ही नेहा अनेकांसाठी नवी होती. 

ब्रेकअप होण्याआधी काही दिवसांपूर्वीच हिमांशने याच रिअॅलिटी शोच्या मंचावर हजेरी लावत नेहासोबतच्या आपल्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली होती. ज्यानंतर सोशल मीडियावरही या जोडीविषयी अनेकांनीच आनंद व्यक्त केला होता. पण, आता याच जोडीच्या नात्यात दुरावा आल्यामुळे चाहत्यांमध्येही नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.