स्तनाच्या कर्करोगावर मात केलेली अभिनेत्री बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल, प्रत्युत्तर देत म्हणाली 'आता विचार...'

 छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिने 'तुम्हारी दिशा' या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Updated: Apr 10, 2024, 09:18 PM IST
स्तनाच्या कर्करोगावर मात केलेली अभिनेत्री बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल, प्रत्युत्तर देत म्हणाली 'आता विचार...' title=

Chhavi Mittal Comment on Trollers : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री छवी मित्तल ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत आहे. तिने विविध मालिकेतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. छवी मित्तलने स्तनाच्या कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली आहे. काही दिवसांपूर्वीच तिची शस्त्रक्रिया पार पडली. छवीने स्तनाच्या कर्करोगावर मात केल्यानंतर तिने अनेक महिलांना या आजाराशी न डगमगता कसे सामोरे जायचे याबद्दलची माहिती दिली होती. पण आता छवी एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. छवीने नुकतंच घातलेल्या बोल्ड कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे. आता तिने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

छवी मित्तल ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी इन्स्टाग्रामवर विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी छवीने काही बोल्ड फोटो शेअर केले होते. या फोटोवर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. आता छवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने 8 फोटो पोस्ट केले आहेत. 

या सर्व फोटोत ती विविध कपड्यात दिसत आहे. यातील पहिल्या फोटोत तिने स्विमिंग सूट परिधान केला आहे. तर दुसऱ्या फोटोत ती जीमच्या कपड्यात दिसत आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या फोटोत तिने बिकिनी परिधान केली आहे. त्यानंतर तिने शर्ट ट्राऊजर, ऑफ शोल्डर ड्रेस आणि ब्लेझर परिधान करुन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना तिने ट्रोलर्सला चपराक लगावली आहे.

"मला तुम्हा सर्वांना आठवण करून द्यायची आहे की तुम्ही कोणते कपडे घालता याने काही फरक पडत नाही. यापेक्षा तुम्ही ते कपडे घातलेल्या लोकांशी कसे वागता, हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे आता विचार बदलण्याची वेळ आली आहे", असे छवी मित्तलने म्हटले आहे. छवी मित्तलची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. अभिनेत्री गौरीने यावर कमेंट करत सकारात्मक राहणे कोणी तुझ्याकडून शिकायला हवे. तू नकारात्मक वातावरणातही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहेस, तुला सलाम असे म्हटले आहे. 

दरम्यान छवी मित्तलला छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. छवीने 'तुम्हारी दिशा' या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने ‘कृष्णदासी’, ‘तीन बहुराणी’, ‘घरची लक्ष्मी कन्या’ यांसह अनेक मालिकेत काम केले आहे. तिचे पती मोहित हुसैन यांची स्वतःची डिजीटल प्रॉडक्शन कंपनी आहे. त्यांना दोन मुले आहेत, एकाचे नाव अरहम आणि दुसरे अरिझा असे आहे.