हैदराबाद : संपूर्ण फॅशन जगाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राहत्या घरात बाथरूमध्ये तिचा मृतदेह आढळला. या घटनेने फॅशन विश्वात शोककळा पसरलीय.
प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेला यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली. ही बातमी समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषा शनिवारी बंजारा हिल्स येथील तिच्या घरात संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आली. फॅशन डिझायनरच्या मृत्यूची बातमी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुरक्षा रक्षकाला प्रथम काहीतरी अनुचित प्रकार झाल्याचा संशय आला. प्रत्युषाच्या घरातून सुरक्षा रक्षकाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने गार्डने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर आत जाऊन पाहिलं असता प्रत्युषाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला.
एएनआयच्या वृत्तानुसार, प्रत्युषाच्या बेडरूममधून कार्बन मोनोऑक्साइड सापडला आहे. हा संशयास्पद मृत्यू लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.