'पीएम नरेंद्र मोदी' आणि 'मनमोहन सिंह'नंतर आता ममता बॅनर्जींवरही चित्रपट

चित्रपट ममता बॅनर्जी यांच्यावरील बायोपिक नसल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले आहे. 

Updated: Apr 12, 2019, 05:25 PM IST
'पीएम नरेंद्र मोदी' आणि 'मनमोहन सिंह'नंतर आता ममता बॅनर्जींवरही चित्रपट title=

नवी दिल्ली : 'पीएम नरेंद्र मोदी' आणि 'मनमोहन सिंह' यांच्या नंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही चित्रपट तयार करण्यात आला आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. येत्या ३ मे रोजी ममता बॅनर्जी यांच्यावर आधारित चित्रपट 'बाघिनी' संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे.

सर्वत्र निवडणूकांचा माहौल असतानाच 'बाघिनी' चित्रपट हळू-हळू चर्चेत येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी हा चित्रपट ममता बॅनर्जी यांच्यावरील बायोपिक नसल्याचे सांगितले आहे. चित्रपटात ममता बॅनर्जी यांच्या नावाचा वापर केला गेला नसल्याचे बोलले जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या जागी चित्रपटात इंदिरा बॅनर्जी यांचे नाव देण्यात आले आहे. ममता यांची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रूम दासगुप्ता हिने दीदी म्हणजेच ममता बॅनर्जींचा अभ्यास केला असल्याचे सांगितले. ममता बॅनर्जी यांचे चालणे, बोलणे, उठणे या सर्वच गोष्टींबाबत अतिशय लक्ष देऊन अभ्यास करावा लागला असल्याचे तिने सांगितले. 

चित्रपटाचे निर्माते आणि लेखक पिंकी मंडल यांनी हा चित्रपट राजकारणावर आधारित नसून एका सामान्य स्त्रीचा असामान्य बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आल्याचे त्यांनी म्हटलंय.