पहिल्यांदाच पंजाबी चित्रपट मराठीत; 'वाळू माफिया'चे पोस्टर प्रदर्शित

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा मराठी रिमेक करण्याचे फॅड चालू आहे. अनेक गाजलेले दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होत आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची बॉक्स ऑफिसवरही चलती आहे.

Updated: Apr 15, 2023, 05:31 PM IST
पहिल्यांदाच पंजाबी चित्रपट मराठीत; 'वाळू माफिया'चे पोस्टर प्रदर्शित  title=

मुंबई : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा मराठी रिमेक करण्याचे फॅड चालू आहे. अनेक गाजलेले दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होत आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची बॉक्स ऑफिसवरही चलती आहे. आता हा ट्रेंड आणखी एक पाऊल पुढे गेला असून आता पंजाबी चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे. रनिंग हॉर्सेस फिल्म्स आणि ग्लोबल टायटन्स प्रस्तुत 'वाळू माफिया' हा चित्रपट मराठीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याव्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. 

सिमरनजीत सिंग हुंदल लिखित, दिग्दर्शित 'वाळू माफिया' येत्या २८ एप्रिल रोजी तिन्ही भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात सिंगा, रांझा विक्रम सिंग, सारा गुरपाल, स्वीताज ब्रार, प्रदीप रावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट वाळू माफियांवर आधारित आहे, याची कल्पना येते. ॲक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटाचे उदय सिंग, विक्रम सिंग, शिरीन मोरानी सिंग निर्माते आहेत. तर वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजचे अमेय खोपकर, अमोल कांगणे आणि प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे. 

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सिमरनजीत सिंग हुंदल म्हणतात, '' हा एक पंजाबी चित्रपट असला तरी हा मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित व्हावा, असे वाटण्याचे कारण म्हणजे एकतर मराठी प्रेक्षक हे चोखंदळ आहेत. त्यांना विविध विषय पडद्यावर बघायला आवडतात. चित्रपटाचा विषय जरी असा असला तरी यात प्रेमकहाणीही आहे. वाळू माफियांचे विश्व यातून पडद्यावर दाखवणायचा आमचा प्रयत्न आहे.''

रनिंग हॅार्सेस फिल्म्सचा हा पहिला मराठी डब चित्रपट असला तरीही भविष्यात मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याची इच्छा विक्रम सिंग यांनी व्यक्त केली.

मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जाते. वाळू चोरीवरुन पंजाबमध्ये गँगवॉर होतं.  वाळू चोरी थांबवण्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत. तरीही वाळू चोरीचं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. तसंच काहिसा प्रकार महाराष्ट्रातही वाळू चोरीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. महाराष्ट्रातही पंजाबप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाळू चोरीचे प्रकारणं समोर येतात. वाळू चोरी कारवाई रोखण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होतात. कारवाई करण्यासाठी अधिकारी वाळूचे ट्रक ताब्यात घेतात तर वाळू चोरीसाठी वापरात येणाऱ्या बोटी स्फोटकांनी उडवल्या जातात. त्यामुळे हा सिनेमा या सगळ्यांवर संदेश देणार हे नक्की.