गे सेलिब्रिटी जोडीच्या आयुष्यात चौथ्यांदा नव्या पाहुण्याची चाहूल

'आम्ही गरोदर आहोत....'

Updated: Oct 4, 2019, 05:35 PM IST
गे सेलिब्रिटी जोडीच्या आयुष्यात चौथ्यांदा नव्या पाहुण्याची चाहूल
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @jwanyosef

मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे समलैंगिक जोडी रिकी मार्टीन आणि त्याचा पती, जोडीदार ज्वान योसेफ यांची. रिकी मार्टीन याने नुकतीच त्याच्या आणि त्याच्या जोडीदाराच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचा प्रवेश होण्याची बाब जाहीर केली. वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या Human Rights Campaign National Dinner या कार्यक्रमात त्याने अत्यंत भावनिक भाषणात ही घोषणा केली. 

अतिशय दिमाखदार अशा स्वरुपात पार पडलेल्या या कार्यक्रमात समलैंगिकांसाठी काम करणाऱ्या रिकीला National Visibility Award हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ही आनंदवार्ता जाहीर करणाऱ्या रिकी आणि ज्वानच्या जीवनात चौथ्यांदा नव्या पाहुण्याचं आगमन होत आहे.  

'माझं कुटुंब आज इथे आहे.... 'असं म्हणत मार्टिनने अतिशय आनंदात त्यात्य़ा कुटुंबीयांचे, पती जॉन आणि दोन्ही मुलांचे आभार मानले. पतीने पावलोपावली दिलेली साथ किती महत्त्वाची आहे, हे सांगत त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं. तर, दोन्ही जुळ्या मुलांप्रतीच्या भावनाही त्याने व्यक्त केल्या. 

'मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे..... आम्ही गरोदर आहोत', असं सांगत रिकी मार्टीनने त्याच्या आणि ज्वानच्या आयुष्यातील एक मोठी बातमी सर्वांसमोर जाहीर केली. यावेळी उपस्थितांमध्येही आनंदाची लाट पसरली. येणाऱ्या बाळाची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत असल्याचं सांगत मला मोठं कुटुंब आवडतं, असंही रिकी यावेळी म्हणाला. ग्रॅमी पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या या कलाकाराने केलेल्या या घोषणेनंतर सोशल मीडिया आणि इतर सर्वच माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात झाली.