मुव्ही रिव्ह्यू : हंपीच सौंदर्य प्रेमात पाडतं, पण...

‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘अ‍ॅन्ड जरा हटके’ सिनेमांच्या माध्यमातून कथा सांगण्याचं आपलं वेगळेपण दाखवणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आता ‘हंप’ हा सिनेमा घेऊन आले आहेत.

Updated: Nov 16, 2017, 04:05 PM IST
मुव्ही रिव्ह्यू : हंपीच सौंदर्य प्रेमात पाडतं, पण... title=

अमित इंगोले, झी मीडिया, मुंबई : ‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘अ‍ॅन्ड जरा हटके’ सिनेमांच्या माध्यमातून कथा सांगण्याचं आपलं वेगळेपण दाखवणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आता ‘हंप’ हा सिनेमा घेऊन आले आहेत.

‘कॉफी आणि बरंच काही’ हा सिनेमा खूप चांगला होता. ‘अ‍ॅन्ड जरा हटके’ मी पाहिला नाही. त्यामुळे प्रकाश कुंटेच्या ‘हंपी’बद्दल उत्सुकता ताणली गेली होती. प्रकाश कुंटे यांचा सिनेमा खूप रिफ्रेशिंग, ताजा आणि टवटवीत दिसतो हाही तसाच रिफ्रेशिंग दिसतो. ‘हंपी’चं डोळे दिपवणारं सौंदर्य चुकवू नये असंच झालंय. पण काही गोष्टींमुळे सिनेमा मजा घालवतो. 

कथानक : 

मुंबईची ईशा(सोनाली कुलकर्णी) ही मनात खूप सारे दु:ख घेऊन ‘हंपी’मध्ये येते. ती आणि तिची मैत्रीण इथे येणार होते. पण काही कारणास्तव ईशा एकटीच येते. ईशाची भेट आधीपासून तिथे असलेल्या कबीरशी होते. ईशाचा मनुष्यावरील विश्वासच उडाला आहे. तिला माणसांचाच राग येतो. पण कबीर तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. दोघे सोबतच ‘हंपी’ची सैर करतात. ऎकमेकांचे विचार शेअर करतात. मात्र ईशा या सर्व गैरसमजांमधून बाहेर येते का? ती प्रेमात पडते का? हे सिनेमात दाखवण्यात आलंय.   

कसा वाटला सिनेमा?

सिनेमाची सुरूवात आणि सिनेमाचा शेवट ‘हंपी’मध्ये होतो. हंपी हे एक पर्यटन स्थळ आहे. जगभरातील लोक इथे फिरण्यासाठी येतात. सिनेमातील अभिनेत्री-अभिनेता हेही तसेच येतात. प्रकाश कुंटे हे नातेसंबंध, मानवी भावभावना या विषयावर मोस्टली सिनेमात करतात. तसाच प्रयत्न ‘हंपी’तही झालाय. पण सिनेमाच्या दोन बाजू सांगता येतील. एक म्हणजे ‘हंपी’च्या सुंदर सुंदर लोकेशन्समुळे सिनेमा रिफ्रेशिंग झाला आहे. पण दुसरीकडे सिनेमाची कथा डायलॉगबाजी आणि जड तत्वज्ञानात गुंतली गेलीये. ट्रेलर पाहून सिनेमात प्रेमाचा त्रिकोण वगैरे असेल असं वाटलं होतं. पण थॅंक गॉड तसं काहीच नव्हतं. नाही तर सिनेमा अधिकच रेंगाळला असता. कारण तशा कथा अनेकदा अनेकांनी पाहिल्या आहेत. पण यात वेगळा प्रयोग करण्यात आलाय. जीवनाचं तत्वज्ञान यातून वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या संदर्भांमधून दाखवण्यात आलं आहे. दोघांमधील सिरीअस संवाद फार कंटाळा आणतो. पण त्याचवेळी त्यांच्या बॅकग्राउंडला दिसत असलेले ‘हंपी’चे सुंदर लोकेशन्स डोळ्यांना आनंद देतात. पटकथेत जरा गोंधळ झालेला असला तरी केवळ ‘हंपी’ची सफारी करण्यासाठीही हा सिनेमा पहायला हवा असं मला वाटतं. पण कथा बघण्यासाठी म्हणून तुम्ही जात असाल तर जरा अपेक्षाभंग होऊ शकतो. सिनेमा ओव्हरऑल बरा आहे असं म्हणता येईल. कारण थिएटरमधून बाहेर पडल्यावर ‘हंपी’च्या लोकेशनशिवाय दुसरं काही लक्षात राहत नाही. नरेंद्र भिडे आणि आदित्य बेडेकर यांनी संगीत दिलेली दोन्ही गाणी चांगली झाली आहेत. वैभव जोशी आणि ओंकार कुलकर्णी यांनी अर्थपूर्ण गाणी लिहिली आहेत. 

दिग्दर्शन -

प्रकाश कुंटे यांनी एक वेगळा अनुभव देण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय. पण ब-याच सिरीअस सीन्समुळे जरा कंटाळा यायला लागतो. बाकी कलाकारांचे लूक्सही मस्त कूल झाले आहेत. दिग्दर्शकाने आपल्या व्हिज्युअलायझेशनने आणि सिनेमटोग्राफरने कॅमेराच्या नजरेतून ‘हंपी’चं सुंदर दर्शन घडवलं आहे. पण आपण थिएटरमध्ये लोकेशन्स बघायला जात नाही. त्यासोबत एक चांगली इंटरेस्टींग कथाही हवी असते. पण इथे जरा ते फिस्कटलंय. 

अभिनय -

सोनाली कुलकर्णी ब-याच दिवसांनी एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेत दिसली आहे. सोनालीने अनेक सीन्समध्ये ईशाचं दु:ख फार चांगलं रेखाटलं आहे. तर ललित प्रभाकरने सुद्धा ठिक काम केलंय. आर्किटेक्ट असूनही त्याचं मराठीतील जड शब्द वापरणं जरा खटकतं पण ती त्याची चूक नाहीये. प्राजक्ता माळीनेही ठिक काम केलं. ती दिसली खूप चांगली आहे. तर छोटी पण लक्षात राहणारी भूमिका प्रियदर्शन जाधव याने केली आहे. तो जेव्हा जेव्हा स्क्रिनवर आला चेह-यावर हसू येतं. 

लेखन -

अदिती मोघे यांनीच प्रकाश कुंटे यांच्या आधीच्या दोन्ही सिनेमांचं लेखन केलं होतं. याही सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद त्यानीच लिहिले आहेत. काही डायलॉग्स चांगले झाले आहेत. पण दोघांमधील संवाद जरा डोक्यावरून जातो. खूप जास्त फिलॉसॉफीचे डोस ते देत असल्याचं जाणवतं. जरा सोपं करून सांगितलं असतं तर अधिक स्पष्ट समजलं असतं. डायलॉग्सवर सिनेमाची मुख्य मदार आहे पण ते लक्ष देऊन ऎकावे लागतात. पटकथाही चांगली झाली आहे. 

एकंदर काय तर हा सिनेमा सिनेमा म्हणून अधिक आवडण्यापेक्षा ‘हंपी’च्या लोकेशनमुळे अधिक आवडेल. हंपी इतकं सुंदर आहे की, सिनेमा बघितल्यावर तुम्ही नक्की ट्रिप प्लॅन कराल हे नक्की. तुम्ही ट्रॅव्हल लव्हर असाल तर कदाचित हा सिनेमा तुम्हाला अधिक आवडू शकतो. पण ते फिलॉसॉफीचे डोस कमी झाले असते तर कदाचित सिनेमा अधिक चांगला झाल असता. 

निर्मिती संस्था : स्वरूप समर्थ एंटरटेनमेंट 
निर्माते : योगेश भालेराव 
दिग्दर्शक : प्रकाश कुंटे 
कथा- पटकथा-संवाद : अदिती मोघे 
कॅमेरा : अमलेंदू चौधरी 
संकलन : प्राची रोहिदास 
गीते : वैभव जोशी (अपनेही रंगमे ), ओंकार कुलकर्णी (मरुगेलरा ओ राघवा) 
गायक : राहुल देशपांडे ( अपनेही रंगमे ), रुपाली मोघे (मरुगेलरा ओ राघवा) 
संगीत : नरेंद्र भिडे आदित्य बेडेकर 
पार्श्व संगीत : आदित्य बेडेकर

रेटींग - २.५ स्टार