Dada Kondke films : 70 ते 80 च्या दशकात सुपरहिट चित्रपट देणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक दिवंगत दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या चित्रपटांची आणि विनोदाची जादू आजही प्रेक्षकांमध्ये आहे. आपल्या अभिनयाने आणि दर्जेदार चित्रपटांनी मराठी चित्रपट निर्माण करणारे दादा कोंडके यांची नक्कल करून आज कलाकार रसिकांचे मनोरंजन करतात. दुहेरी अर्थ असणाऱ्या संवादांनी दादा भल्याभल्यांची हवा गुल करायचे. सेन्सॉर बोर्डदेखील त्यांच्या चित्रपटांवर कैची चालवू शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या चित्रपटांसोबतच अनेक हिंदी चित्रपटातही काम केले.
दादांनी सिनेमॅटोग्राफीने जास्तीत जास्त रौप्यमहोत्सवी चित्रपट दिले, म्हणजेच त्यांचे चित्रपट 25 आठवडे थिएटरमध्ये सुरू राहायचे. त्यामुळे त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. परंतु, दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनंतरही त्यांच्या संपत्तीचा वाद मिटलेला नाही.
दादा कोंडके यांनी 2 जानेवारी 1998 रोजी इच्छापत्र तयार केले. इच्छापत्राचे कार्यवाह म्हणून 'शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान' स्थापन केले. केवळ दादा कोंडके यांची मालमत्ता मिळावी यासाठी तेजस्विनी विजय शिवा यांनी वारसपत्र मिळवण्यासाठी पुणे दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला. पुणे दिवाणी न्यायालयाने त्यांना वारसपत्र दिले.
पाठपुरावा म्हणून एव्हरेस्ट एंटरटेनमेंट कंपनीने 12 ऑगस्ट 2022 रोजी माणिक मोरे यांच्याशी करार करुन संबंधित 12 चित्रपटांचे कॉपीराइट प्राप्त केले होते. त्यामुळे दादा कोंडके यांच्या नावावर असलेल्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टला 12 चित्रपटांवर कुठलाही दावा सांगता येणार नाही, असे एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे वकील विराग तुळजापूरकर यांनी सांगितले. त्यांचा मध्यस्थी घेत न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी शाहीर दादा कोंडके यांच्या आस्थापनाला पुढील आदेशापर्यंत दादा कोंडके यांच्या 12 चित्रपटांचे कोणतेही अधिकार हक्क त्रयस्थ पक्षकाराला न देण्याचा आदेश शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानला देण्यात आला आहे.
तसेच बॉम्बे फिल्म एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी त्यांच्या ताब्यातील 12 चित्रपट निगेटिव्ह/प्रिंट पॉझिटिव्ह वा इतर कोणतेही साहित्य शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानसह या ट्रस्टचे विश्वस्त वा अन्य कोणालाही सुपूर्द करु नये, असाही आदेश दिला. त्यामुळे शाहीर दादा कोंडके यांच्या स्थापनेला धक्का असून एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला. दरम्यान न्यायालयाने प्रतिवादींना येत्या पाच आठवड्यांत या याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.