VIDEO : 'एक चतुर नार...'चे खरे गायक किशोर कुमार नव्हे, तर...

भोले.... गजब हो गया!

Updated: Dec 3, 2018, 09:42 AM IST
VIDEO : 'एक चतुर नार...'चे खरे गायक किशोर कुमार नव्हे, तर...  title=

मुंबई : हिंदी चित्रपटविश्वातील काही जुन्या चित्रपटगीतांचा विषय निघाला की एका गायकाचं नाव अनेकांच्याच मनात येतं. ते नाव म्हणजे किशोर कुमार. अनोखी गायनशैली, गाण्यातही तितक्याच प्रभावीपणे दिसणारा त्यांचा खोडकर अंदाज ही त्यांच्यी गाण्यांची वैशिष्ट्य. त्यांनी गायलेल्या गाण्यांची यादी तशी फार मोठी. पण, या यादीत बरंच लोकप्रिय असणारं गाणं म्हणजे एक चतुर नार. 

'पडोसन' या चित्रपटातील हे गाणं, गायक म्हणून किशोर कुमार किती समृद्ध होते, याची प्रचिती देतंच. पण, सोबतच त्यांच्या आणि गाण्यातून झळकणाऱ्या इतरही कलाकारांच्या सुरेख अभिनयाची झलक दाखवून जातं. 

१९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पडोसन' या चित्रपटातील 'चतुर नार' हे गाणं मन्ना डे आणि किशोर कुमार यांच्या आवाजांमुळे अजरामर झालं. पण, तुम्हाला माहित आहे का, हे, त्या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन होतं. 

कसं....? १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झूला' या चित्रपटात हे गाणं पहिल्यांदा पाहायला मिळालं होतं. किशोर कुमार यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कुमार यांनी याच चित्रपटात  'एक चतुर नार'चे सूर छेडले होते. 

युट्यूबवर या गाण्याचा व्हिडिओ उपलब्ध असून मुंबईच्या महेंद्र जैन यांनी ट्विट करत याविषयीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली. जैन यांच्या या ट्विटनंतर अनेकांनीच अशोक कुमार यांनी गायलेल्या गाण्याची झलकही पाहिली. या दोन्ही गाण्यांमध्ये कमालीचा फरक असला तरीही त्यांची चाल आणि शब्द मात्र मिळतेजुळते आहेत हेसुद्धा तितकच खरं.