६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!

सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 

Updated: Nov 15, 2017, 06:12 PM IST
६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!

मुंबई : सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे. निर्माता दिग्दर्शक करण जोहर यानं ट्विटरवर याची घोषणा केली आहे. धडक हे सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव असेल. ६ जुलै २०१८ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या घोषणेबरोबरच करण जोहरनं या चित्रपटाचं पोस्टर आणि काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

नागराज मंजुळेंच्या सैराटनं मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे विक्रम मोडीत काढले. मराठीतल्या सैराटचं यश बघून बॉलीवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं हिंदीमध्ये सैराट बनवण्याचा निर्णय घेतला. हिंदी सैराटमध्ये आर्चीच्या भूमिकेमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तर परशाच्या भूमिकेत शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर दिसणार आहे. शशांक खैतान या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

महाराष्ट्रातलं ऑनर किलिंगचं धक्कादायक वास्तव सैराटमध्ये दाखवण्यात आलं होतं. सैराटच्या हिंदी रिमेकचं शूटिंग राजस्थानमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे. 

सैराट बनवण्यासाठी सुमारे ४ कोटींचा खर्च आला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणार्‍या या चित्रपटाने सुमारे ११० कोटींची कमाई केली होती. आता या ब्लॉकबस्टर सिनेमाचे राईट्स करण जोहरने नागराज मंजुळेकडून विकत घेतले आहेत.

करण जोहर हिंदीमध्ये 'सैराट'चा रिमेक करत असला तरीही तो चित्रपट सारखा नसेल. हिंदी चित्रपटाच्या रसिकांच्या आवडीनिवडीनुसार त्यामध्ये बदल केले जातील. त्यामुळे करण जोहरच्या नजरेतून 'सैराट" कसा दिसतोय हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे.