'दयाबेनशिवाय मालिका पुढे नेणार कशी?'

छोट्या पडद्यावर जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीचा खुलासा

Updated: Jul 14, 2019, 02:41 PM IST
'दयाबेनशिवाय मालिका पुढे नेणार कशी?'

मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा वकानीने अखेर मालिकेला राम-राम ठोकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु दिलीप जोशीने दयाबेनने पुन्हा मालिकेत परत येण्याची आशा व्यक्त केली आहे. अभिनेता दिलीप जोशी 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. मालिकेमध्ये दिशा वकानी आणि दिलीप जोशी हे दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत झळकत होते. पण आता 'दयाबेन'च्या जागी कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्यापही गुलस्त्यात आहे. 

दरम्यान, दयाबेनच्या भूमिकेवर चांगलीच चर्चा रंगत आहे. नुकताच 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या एका मुलाखतीत दिलीपला दिशाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा 'दयाबेन' ही भूमिका मालिकेतील सर्वात महत्वाची भूमिका असल्याच सांगत, तो म्हणाला की, 'दोन वर्षांआधी दिशाने प्रसुतीच्या कारणामुळे मालिकेतून काही काळासाठी माघार घेतली होती. त्यानंतर ही मालिका पुढे मार्गक्रमण कशी करणार अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटत होती, कारण जेठालाल आणि दया या दोन्ही भूमिका मालिकेसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. '

'दयाबेन' या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले होते. मालिकेत आता दिशाची जागा कोणती अभिनेत्री घेणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 'बडे अच्छे हैं' आणि 'हमने ली शपथ' या मालिकांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विभूती शर्मा 'दयाबेन'ची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. 

शिवाय, तिने या भूमिकेसाठी ऑडिशन सुद्धा दिले आहे. त्यामुळे 'दयाबेन'च्या भूमिकेसाठी तिची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालिका निर्मात्यांनी दयाबेनच्या भूमिकेबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. दयाबेन हे पात्र पुन्हा मालिकेत उतरवण्यास निर्माते घाई करणार नसल्याचे समजत आहे.