मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानी हिचा पिरामल उद्योग समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा होत आहे. परदेशात जवळपास तीन दिवस हा साखपुड्याचा समारंभ आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पार पडणार आहेत.
इटलीमधील उत्तरेकडे असणाऱ्या लेक कोमो या भागात या दिमाखदार सोहळ्याची रंगत दिसत असून, अंबानी यांच्या घरातील या शुभकार्याला हजेरी लावण्यासाठी आमंत्रितांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
बी- टाऊन सेलिब्रिटीही यात मागे राहिलेले नाहीत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, तिचा होणारा पती निक जोनासही अस्सल भारतीय वेशात ईशाच्या साखरपुड्याच्या समारंभासाठी पोहोचले. तर, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासुद्धा इटलीला पोहोचला आहे.
'देसी गर्ल' आणि तिच्या परदेशी प्रियकराव्यतिरिक्त निर्माता-दिग्दर्श करण जोहर, अभिनेता अनिल कपूर, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी कपूरसुद्धा सध्या लेक कोमो येथे पोहोचले आहेत.
उद्योग, कला आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सध्या या साखरपुड्याचीच चर्चा सुरु असून, सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो व्हायरल होण्यासही सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात ईशा आणि आनंद यांचा विवाहसोहळा असल्याचं कळत आहे.