मुंबई : ठरलं तर मग या मालिकेत सायली ही भूमिका साकररुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवणारी अभिनेत्री जुई गडकरी नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर जुईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. जुई ठरलं तर मग आधी बिग बॉस, 'पुढचं पाऊल' या मालिकेमुळे घरा-घरात पोहचली. 'पुढचं पाऊल' या मालिकेत जुईने कल्याणी हे पात्र साकारलं होतं. अभिनेत्रीच्या या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री शैक्षणिक जीवनात कशी होती याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुईने खुलासा केला आहे.
आज मालिकासिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री एकेकाळी महाविद्यालयात असताना नापास झाली होती. हे तुम्हाला माहीतीये का? होय नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने कॉलेजच्या जीवनातील बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. याचबरोबर तिने तिचा शालेय प्रवासदेखील प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. तिला शाळेत असताना अभ्यासाची फारशी आवड नव्हती. इतकंच नव्हेतर तिने गायनाला सर्वाधिक प्राध्यान्या दिल्याचंही अभिनेत्री म्हणते
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली की, ''माझे शाळेचे दिवस फार वाईट होते कारण, मला अभ्यास करायला कधीच आवडायचं नाही. मला दहावीत सुद्धा फक्त ५८.८० टक्के गुण मिळाले होते. तेव्हा मला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची खूप इच्छा होती. याचं कारण म्हणजे मला व्हेटर्नरी सर्जन व्हायचं होतं. माझं प्राणीप्रेम सर्वांनाच माहिती आहे. पण, ५८ टक्क्याला सायन्ससाठी मला कोणत्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. शेवटी माझ्या आईने कॉमर्स केलेलं म्हणून तिने कॉमर्सला प्रवेश घे असं मला सांगितलं.''माझ्याकडे गाण्याच्या विविध स्पर्धांची प्रमाणपत्र असल्याने मला सीएचएम कॉलेजमध्ये सांस्कृतिक कोट्यामधून प्रवेश मिळाला.''
''कॉलेजमध्ये मी सांस्कृतिक विभागात सहभाग घेतला होता. कॉलेज सुरू झाल्यावर पुढे वर्षभर माझ्या गाण्यांचे कार्यक्रम सुरू होते. मी वर्गात तासिकांना अजिबात बसायचे नाही. अकरावीत असताना मला ६७ टक्के मिळाले पण, गणित विषय राहिल्याने मी नापास झाले. गणितात १०३ पैकी मला फक्त ३ गुण मिळाले होते. तेव्हा माझ्या एका सरांनी आई-बाबांची समजूत काढली. त्यांनी जुई बाहेरून बारावी पूर्ण करेल असं आश्वासन माझ्या घरी दिलं.''
''माझ्या सरांच्या सांगण्यानुसार मी बारावी बाहेरून दिली…अभ्यास करून अगदी छान पास झाले. बारावीचा निकाल लागल्यावर मी माझ्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेतला ती शाखा म्हणजे बीएमएम (BMM). सगळं आवडीनुसार केल्यामुळे पुढे, पदवीच्या शेवटच्या वर्षात मी विद्यापीठातून पहिली आले होते. आयुष्यात आवडीच्या गोष्टी मिळाल्यावर मी सगळं छान करू शकते. अन्यथा मी खूप हट्टी मुलगी आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी पदव्युत्तर पदवी परीक्षा पास केली, एमबीए केलं पुढे सगळं छान झालं.'' असं जुई गडकरीने दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.