Chinmay Mandlekar Wife Angry On Son Trolling : मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरला ओळखले जाते. चिन्मयने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गेल्या काही वर्षांपासून चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. यावरुन त्याला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता नेहा मांडलेकर यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा सोशल मीडियावर सक्रीय असते. आता नेहाने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने घडलेला प्रकार सविस्तरपणे सांगितला आहे. नेहाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर एका नेटकऱ्याने 'स्वत:च्या मुलाला जहांगीर असं मुघलांचे नाव देणारा हा नाच्या', अशी कमेंट करण्यात आली होती. त्यावर नेहाने सडेतोड उत्तर दिले आहे. "सॉरी हा दादा, तुम्हाला न विचारता आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. पण तुम्हाला कसं विचारलं असतं आम्ही... फेक अकाऊंट आहे ना तुमचं...मला तुमचा नंबर पाठवाल का? म्हणजे जहांगीरच्या मुलाचं नाव आम्ही तुम्हाला विचारुन ठेवू, जय शिवराय", असे नेहाने म्हटले आहे.
तर 'एकाने जहांगीर कसा आहे', अशी कमेंट करत स्माईल इमोजी वापरला आहे. त्यावरही नेहाने संताप व्यक्त केला आहे. "मस्त आहे आणि मस्तच राहिल. तुमच्या आशीर्वादाने... मी जहांगीरची आई... आमच्या लेकाचा इतक्या आपुलकीने विचारपूस केली... तुमचे खूप खूप आभार", असे नेहाने कमेंट करत म्हटले. यासोबतच नेहाने या पोस्टला कॅप्शन देताना या ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे. तिने या दोन्हीही ट्रोलर्सचे आभार मानले आहेत. "धन्यवाद, तुम्ही इतकं छान बोललात आमच्याबद्दल... आमच्या मुलाबद्दल... तुमचं हे ज्ञानामृत वारंवार शेअर करायची आम्हाला संधी द्याल अशी आशा करते. देव तुमचं भलं करो... अनेक सदिच्छा", असे नेहाने म्हटले आहे.
या प्रकरणानंतर ट्रोल करणाऱ्या एकाने नेहाची माफी मागितली आहे. 'मला माफ करा मॅडम... मी सरांबद्दल चुकीची कमेंट केली होती त्याबद्दल... मी कमेंट डिलीट केली आहे. परत अशी चूक कुणाच्याच बाबतीत करणार नाही...सॉरी... माझी चूक माझ्या लक्षात आली', असे त्या ट्रोलरने म्हटले आहे.
या पोस्टला कॅप्शन देताना नेहाने त्या ट्रोलरची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. "आहो आमची माफी वैगरे नको हो... आणि सर वैगरे काय म्हणताय उगाच!! आम्ही नाचे आणि त्याचा प्रचंड अभिमान आहे आम्हाला. फक्त एक लक्षात ठेवा... हा देश स्वतंत्र आहे. आणि आपण या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक...आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवून गुन्हा केलेला नाही. तसं केलं असतं तर कायद्याने शिक्षा केली असती आम्हाला... या देशाच्या संविधानाने आम्हाला आमच्या मुलाचं नाव आमच्या मर्जीने ठेवण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. आम्ही तो बजावला आणि त्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला... संविधानापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. कधीच नाही. जय शिवराय", असे नेहा मांडलेकरने म्हटले आहे.
दरम्यान याआधीही एकदा चिन्मय मांडलेकरने मुलगा जहांगीरच्या नावाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. "माझ्या मुलाचा जन्म जमशेदी नवरोसच्या दिवशी झाला. त्यामुळे मी भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या नावावरुन त्याचं नाव जहांगीर असं ठेवलं. भारताला एअर इंडिया आणि टायटन सारख्या अनेक कंपन्या देणाऱ्या मोठ्या माणसाचं नाव आपल्या मुलाला द्यावं, हा त्यामागचा हेतू होता", असे चिन्मय मांडलेकर म्हणाला होता.