'याड' लावणाऱ्या रिंकूची लगीनघाई?

झालात ना तुम्हीही थक्क?

Updated: Jun 19, 2019, 12:24 PM IST
'याड' लावणाऱ्या रिंकूची लगीनघाई?

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटातून रिंकू राजगुरू हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला. बरं नुसता प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही, तर आर्चीच्या रुपातील या चेहऱ्याचा प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. त्यांना अक्षरश: 'याड लावलं'. 'सैराट'मुळे प्रकाशझोतात आलेल्या रिंकूने पाहता पाहता तिचा वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला. पुढे ती 'कागर' या चित्रपटातूनही झळकली. काही दिवसांपूर्वीच बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारी ही रिंकू आता म्हणे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 

झालात ना तुम्हीही थक्क? अर्थात ही बाब अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारीच आहे. सोशल मीडियावर सध्या रिंकूचे साडीच्या लूकमधील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती कोणा एका नववधूप्रमाणे तयार झाली आहे. तेव्हा तिचं हे नेमकं रुप आहे तरी कशासाठी असाच प्रश्न काही चाहत्यांनी उपस्थित केला.

हे फोटो नेमके कोणत्या कार्यक्रमातील आहेत, की तिच्या आगामी चित्रपटातील हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे रिंकूच्या लग्नाच्याच चर्चा होत आहेत हेसुद्धा तितकंच खरं. रिंकूचा हा अंदाज आणि तिची अदा पाहता याविषयीची खरी माहिती जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

 

तुर्तास रिंकू किंवा तिच्याशी संलग्न कोणीही अद्यापही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. शिवाय त्याविषयीची कोणतीच माहितीसुद्धा उघड केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी या चर्चांचंच वादळ आणखी काही दिवस लक्ष वेधणार हे खरं.