गणपतीची लगबग अन् अचानक आलेली एक मुलगी..., 'घरत गणपती'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 25 वर्षांनी अश्विनी भावे आणि अजिंक्य देव एकत्र येणार आहेत.  

Updated: Jun 25, 2024, 03:56 PM IST
गणपतीची लगबग अन् अचानक आलेली एक मुलगी..., 'घरत गणपती'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित title=

Gharat Ganpati Teaser Release : कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा समजला जातो. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा सण उत्साहात साजरा होता. याच उत्साह वर्धक  सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

'घरत गणपती' या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात गणपती बाप्पा घरी येणार याची लगबग सुरु असल्यापासून होते. यानंतर आरती, समई, सजावट अशी तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळते. यानंतर मग घरातील पुरुष मंडळी बाप्पाची मुर्ती आणण्यासाठी कार्यशाळेत पोहोचतात. यानंतर गणपतीची मुर्ती घरात घेऊन येत असताना अचानक एका मुलीची एंट्री होते. आता ही मुलगी नेमकी कोण, ती या कुटुंबात का येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

25 वर्षांनी अश्विनी भावे आणि अजिंक्य देव एकत्र

'घरत गणपती' या चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 25 वर्षांनी अश्विनी भावे आणि अजिंक्य देव एकत्र येणार आहेत.  

‘आपलं प्रत्येकाचं गणपती बाप्पाशी खास नातं असतं.  गणपतीच्या वेळी केलेली धमाल वेगळीच असते. हीच धमाल दाखवताना गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाला  नात्यांचे  सूर  कसे गवसणार? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना निखळ आनंद मिळेलच पण या  चित्रपटाची गोष्ट प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आणि प्रेमळ नात्यांची आठवण करून देईल, अशा विश्वास या चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केला.

येत्या 26 जुलैला प्रदर्शित होणार चित्रपट

दरम्यान पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा चित्रपट 26 जुलैला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी केले आहे. तर कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.