मुंबई : आघाडीचा कॉमेडिअन राजू श्रीवास्तवची गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू आहे. राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट दिलीय. ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पण राजू अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. आता प्रत्येकाला त्यांच्या शुद्धीवर येण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बिग बी म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांना एक ऑडिओ मेसेज पाठवून त्यांच्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी सांगितलं आहे.
राजूच्या कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बींनी राजू श्रीवास्तव यांच्या फोनवर मेसेज पाठवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बिग बींनी राजू यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी सांगितलं. पण प्रकृती स्थिर नसल्यामुळे राजू यांना मेसेज वाचता आले नाहीत.
राजू यांच्या कुटुंबाने बिग बींनी पावलेले मेसेज वाचले. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितलं की, राजू प्रतिसाद देऊ शकत नाही, पण ते आजूबाजूचा आवाज ऐकू शकतात. अशात जर जवळच्या व्यक्तीचा आवाज राजू यांच्या कानावर पडला तर त्यांची प्रकृती सुधारू शकते.
त्यामुळे राजू यांच्या कुटुंबाने बिग बींना त्यांचा आवाज रेकॉर्ड करुण पाठवण्याची विनंती केली. कुटुंबाने अमिताभ बच्चन यांना डॉक्टरांनी दिलेला सल्लाही सांगितलाय. प्रिय व्यक्तीच्या आवाजाचा राजू यांच्या प्रकृतीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यानंतर पाच मिनिटांतच बिग बींनी राजू यांना त्यांच्या खास शैलीत एक ऑडिओ संदेश पाठवला.
कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बी म्हणाले की उठ राजू, खूप झालं. खूप काम करायचं आहे... आता उठा आणि आम्हा सर्वांना हसायला शिकवत रहा. असा ऑडिओ मेसेज बिग बींनी राजू यांना पाठवला.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.