अण्णा नाईक परत येणार....आता कोणत्याही रुपात...

‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…

Updated: Mar 18, 2021, 12:29 PM IST
अण्णा नाईक परत येणार....आता कोणत्याही रुपात...

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चालेल' (Ratris Khel Chale 3)  प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे. या मालिकेच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. (Anna Naik will meet Ratris Khel Chale part 3) मालिकेचा तिसरा भाग 22 मार्चपासून रात्री 11 वाजता प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. 

मालिकेतील लोकप्रिय पात्र अण्णा नाईक हे परत येणार आहेत. पण ते कोणत्या रुपात येतील ते मात्र सांगणं, थोडं कठीण आहे. 'रात्री खेळ चाले' भाग 3 मध्ये अण्णा नाईक असणार पण आणि नसणार पण... मालिकेच्या दुसऱ्या भागात अण्णा नाईक यांचं निधन झाल्याचं दाखवलं आहे. आता तिसऱ्या भागात अण्णा नाईक कोणत्या रुपात दिसणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (रात्रीस खेळ चाले : अण्णा नाईक परत येणार?) 

काय म्हणतात अण्णा नाईक?

या व्हिडिओत अण्णा नाईकच एका व्यक्तीला वाडा विकण्यासाठी दाखवत आहे. 200-250 वर्षांपूर्वीचा हा वाडा आहे. आता इथे आम्ही कुणी राहत नाही... तुम्ही वाडा बघून घ्या... असं म्हणत अण्णा नाईक बंद दारातून आत जातात आणि गायब होतात... अण्णा नाईक कोणत्या रुपात येतील हे काही सांगू शकत नाही. 

‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’, ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत असेलच! याप्रमाणेच आता 'अण्णा नाईक परत येणार' ही चर्चा रंगली आहे. अगदी कोकणातल्या रस्त्यांपासून ते मुंबईतल्या लोकलमध्येही अण्णा नाईक दिसले आहेत. 

या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मालिका कशी असणार आहे, याची झलक पाहायला मिळतेय, पहिल्यांदाच हा प्रोमो पाहणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ यंदाच्या पर्वात अण्णा नाईकांचा दरारा आणि भय आणखी वाढणार आहे.