'सैराट हिंदी'त येतोय, हे साकारणार 'आर्ची-परशा'

मराठीतील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडणा-या सैराट या सिनेमाचा हिंदीमध्ये रिमेक बनवण्याचा विडा आता करण जोहरने उचलला आहे.

Updated: Nov 9, 2017, 01:08 PM IST
'सैराट हिंदी'त येतोय, हे साकारणार 'आर्ची-परशा' title=

मुंबई : सैराटच्या आर्चीनं महाराष्ट्राला वेड लावलं. मराठीतील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडणा-या सैराट या सिनेमाचा हिंदीमध्ये रिमेक बनवण्याचा विडा आता करण जोहरने उचलला आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमात तिची साथ देतोय, शाहिद कपूरचा भाऊ इशान. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित आर्ची-परशाच्या 'सैराट'ने सर्वांनाच याड लावलं. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलाही याड लावलं होतं. दिग्दर्शक करण जोहरलाही चित्रपटाने भुरळ पाडली असून, त्याने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहे.

सैराट सुपरडुपर हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी बॉलीवुडमधील अनेक निर्माते उत्सुक होते. मात्र अखेरीस करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने बाजी मारत हे हक्क मिळवले.  या चित्रपटाचे कथानक बऱ्यापैकी सैराटसारखे राहणार आहे. 

मात्र संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्गाला विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. हिंदी सैराटचं कास्टिंग झालं असून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे.

सैराटमध्ये आर्ची उर्फ रिंकू राजगुरुने सगळ्यांचीच मनं जिंकली होती. तिच्या गावरान भाषेने तर महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला वेड लावल होतं...त्यामुळेच रिंकूचीही लोकप्रियता बघता सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये आर्चीच्या भूमिकेत रिंकूलाच कास्ट करण्यात आले होतं. पण करण जोहरने सिेनमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये जान्हवी कपूरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यात हिंदी सैराटचं शूटिंग सुरु होणार आहे. 

राजस्थानमधील उदयपूर येथे या सिनेमाचं शूट सुरु होतयं..शशांक खेतान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.. हा चित्रपट 18 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स' मध्ये झळकला होता. तर उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.

जान्हवी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास उत्सुक आहे. करण जोहरने तिला काही महिन्यांपूर्वी साईन केलं होतं. त्यावेळी करणने सैराटचे हक्क विकत घेतले होते. मात्र जान्हवीला सैराट सिनेमात रोल ऑफर केला आहे, की दुसऱ्या सिनेमाची जुळवाजुळव सुरु आहे, हे तेव्हा स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. पण आता या सगळ्यावरुन पडदा उठला आहे.

आता गावरान आर्चीची सर मॉर्डन आर्चीला येते का? याकडे हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.