ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण यांचं वयाच्या ६३व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं.

Updated: Aug 24, 2018, 08:35 AM IST
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन  title=

मुंबई : अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण यांचं वयाच्या ६३व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं.विजय चव्हाण यांची प्रकृती  गेल्या काही दिवसांपासून खालावली होती..त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते...नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रात विजय चव्हाण यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवलीये. विनोदाचं अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना आपल्या संवादांनी आपलंसं करण्यात विजय चव्हाण यांचा हातखंडा होता.

'मोरुची मावशी'

विजय चव्हाण यांचं 'मोरुची मावशी' हे नाटक म्हणजे तर रसिकांसाठी हास्याची मेजवानी होती.  आजही मोरूची मावशी म्हटलं की विजय चव्हाण यांचंच नाव अग्रक्रमाने येतं. विजय चव्हाण रंगभूमीवर जेवढे रमले तेवढंच त्यांनी सिनेमातही स्वतःला झोकून दिलं होतं. जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये विजय चव्हाण यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या 'वहिनीची माया' या चित्रपटाव्दारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नुकतचं त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवलं होतं..