मराठी मालिका विश्वाला हादरा; लोकप्रिय मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलरकडून अभिनेत्रीकडे अश्लील मागणी

मराठी मालिका विश्वाला हादरा

Updated: Dec 2, 2021, 05:16 PM IST
मराठी मालिका विश्वाला हादरा; लोकप्रिय मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलरकडून अभिनेत्रीकडे अश्लील मागणी
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : मालिका विश्वात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका आता अतिशय मोठ्या कारणामुळं चर्चेत आली आहे. मालिकेतील अभिनेत्रीनं प्रोडक्शन कंट्रोलर विरोधात गोरेगावमधील आरे पोलीस स्थानकात अश्लील मागणी करण्यासंबंधीची तक्रार दाखल केली होती.

आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या इसमानं केल्याचा आरोपही या अभिनेत्रीनं केला. ज्यानंतर सदर प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेतील काही कालकारांकडून आपला मानसिक छळ केला जात असल्याचं सांगत तक्रा दाखल केली. ज्यानंतर आता स्वाती भदावे नामक अभिनेत्रीनं काही गंभीर आरोपांना वाचा फोडल्यामुळे मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

स्वातीनं दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रकरण 2020 मधील आहे. पण, अन्नपूर्णा यांनी आवाज उठवल्यानंतर आता तीसुद्धा पुढे आवी आणि सर्व प्रकार उघडकीस आणला. 

2020 मध्ये स्वातीला एकदा मालिकेच्या चित्रीकरणासाठी बोलवण्यात आलं होतं. जिथे प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडेनं तिचा फोन नंबर घेतला. काही दिवसांनी त्यानं तिला फोन केला. 

इथल्यातिथल्या गोष्टी केल्यानंतर पुण्यात चित्रीकरण आहे, करशील का? असा प्रश्न त्याने तिला केला. हो करेन काम, तुम्ही मला इतकी मोठी संधी देताय, अशा शब्दात स्वातीनं त्याचे आभार मानले. 

त्याच्या मनात मात्र काही वेगळं होतं. मी तुला संधी दिली, या बदल्यात मला काय मिळणार? असं तो म्हणाला. स्वातीला काही लक्षात आलं नाही. 

समोरची व्यक्ती कमिशन मागत असल्याचा अंदाज तिनं बांधला. मला पैसे मिळाले की, तुम्हालाही देईन असं ती म्हणाली. यावर, तुला कळत नाही एका पुरुषाला महिलेकडून काय हवं असतं.... लहान आहेस का? असं तो म्हणाला. 

शारीरिक संबंधांकडे त्याच्या बोलण्याचा सारा रोख होता. हे लक्षात येताच , मला परत फोन केला किंवा असं उलटसुलट काही बोललास तर पोलिसांत तक्रार करेन अशी भीती तिनं घातली. 

पोलिसांची भीती घालताच असा प्रयत्नही केलास तरी तुला बदनाम करेन अशी धमकी या लोखंडे नामक व्यक्तीने स्वातीला दिली. 

30 नोव्हेंबरला पोलिसांत या प्रकरणाची रितसर एफआयआर दाखल झाल्यानंतर तपास मार्गी लागला आणि लोखंडेला अटक करण्यात आली. 

मराठी कलाविश्वातून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे सध्या मालिका विश्वाला जबर हादरा बसला आहे.