बस हो गया बस! अश्लील कमेंट्स पाहून अभिनेत्रीचा संताप

कशाचाही विचार न करता... 

Updated: Jun 12, 2020, 11:20 PM IST
बस हो गया बस! अश्लील कमेंट्स पाहून अभिनेत्रीचा संताप
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सहसा सोशल मीडियाच्या माध्यमाकडे सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारं अंतर कमी करणारा दुवा म्हणून पाहिलं जातं. पण, गेल्या काही दिवसांपासून या माध्यमावर हे अंतर कमी होण्यापेक्षा अधिक वाढत असल्याचं चिन्हं आहे. याला कारण ठरत आहे ते म्हणजे सोशल मीडियावर नेटकऱ्यांना असणारी मोकळीक आणि त्याचा अनेकांकडून घेतला जाणारा गैरफायदा. 

एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला अशाच बेशिस्त नेटकऱ्यांच्या बेताल वागण्याचा आणि त्यांच्या अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागला आहे. नेटकऱ्यांच्या कमेंट्स पाहून या अभिनेत्रीनंही त्यांना चांगलंच वठणीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

ही अभिनेत्री आहे श्वेता साळवे. अवघ्या १६ वर्षांच्या एका मुलाच्या वाईट कमेंट तिनं साऱ्या जगासमोर आणल्या आहेत. शिवाय तिनं #IgnoreNoMore असा हॅशटॅग वापरत अशी अश्लील कृत्य करणाऱ्यांविरोधात आवाजही उठवला आहे. यामध्ये अभिनेत्री हिना खान हिनंही तिला साथ दिली आहे. 

टेलिव्हिजन अभिनेत्री अश्का गोरडिया हिच्यासाठी श्वेतानं ही मोहीम सुरु केली आहे. अश्का सोशल मीडियावर योगासनं करतानाचे तिचे काही व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या याच पोस्टवर एका नेटकऱ्यानं अतिशय खालच्या दर्जाला जाऊऩ कमेंट केल्या. त्यावेळी मग, श्वेतानं या कमेंटचे स्क्रिनशॉट काढत या नेटकऱ्याला चांगलीच अद्दल घडवली आहे.

'हा एक १६  वर्षीय मुलगा आहे. ज्यानं माझ्या मैत्रिणीच्या लाईव्ह व्हिडिओदरम्यान कशाचाही विचार न करता अश्लील कमेंट्स केल्या. ज्यावेळी मी रितसर तक्रार दाखल करण्याविषयी म्हटलं तेव्हा तो माफी मागू लागला. मी एकच सांगू इच्छिते की आम्ही हे आणखी सहन करणार नाही. एकतर हे सारं बंद करा किंवा मग परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार राहा. कारण आता आम्ही सहन करणारच नाही', असं तिनं लिहिलं. 

 

श्वेताला हिना खान, मेघना नायडू, नारायणी शास्त्री यांनीही साथ देत अशी कृत्य करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला. त्या साऱ्यांच्या तक्रारी आणि संतापाला वाचा फोडत श्वेतानं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उचलून धरल्याचं पाहायला मिळालं. या मुलांना त्यांच्या दुष्कृत्यांची शिक्षा केव्हा मिळणार, आम्हाला सुरक्षित केव्हा वाटणार असे अतिशय महत्त्वाचे प्रश्न तिनं उपस्थित केले. श्वेता आणि इतर अभिनेत्रींचा संताप पाहता एका माध्याचा होणारा हा दुरुपयोग किमान आतातरी थांबला गेला पाहिजे अशीच गरज प्रकर्षानं वाटू लागली आहे.