सोनम कपूरच्या घरात काम करणाऱ्या नर्सला 'या' प्रकरणात अटक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरी 2.4 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरीला गेल्याची बातमी आली होती

Updated: Apr 13, 2022, 07:34 PM IST
सोनम कपूरच्या घरात काम करणाऱ्या नर्सला 'या' प्रकरणात अटक title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरी 2.4 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरीला गेल्याची बातमी आली होती आणि त्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता हा चोर पोलिसांच्या हाती लागला आहे.  ही चोरी एक नर्सने तिच्या पतीसोबत फेब्रुवारी महिन्यात केली होती. सोनम कपूरच्या सासूची काळजी घेण्यासाठी या नर्सला ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सोनम कपूरच्या सासूची काळजी नर्स घेत होती
पोलिसांनी नुकतच सांगितलं की, अपर्णा रुथ विल्सन ही सोनम कपूरच्या सासू-सासऱ्यांची देखरेख करत असे आणि तिचा नवरा नरेश कुमार सागर हा शकरपूरमधील एका खासगी कंपनीत अकाउंटंट आहे.

20 पेक्षा जास्त लोकं घरी काम करतात
पोलिसांनी सांगितलं की, चोरी 11 फेब्रुवारीला झाली आणि 23 फेब्रुवारीला तुगलक रोड पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणातील तक्रारदार सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या  या घरात 20 हून अधिक लोकं काम करतात.

२.४ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने  गेले चोरीला
सोनम कपूर आणि तिच्या पतीच्या मॅनेजरने त्यांच्या घरातून २.४ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरीला गेल्याची तक्रार केली होती. पोलिस उपायुक्तांनी सांगितलं होतं की, या दाम्पत्याला 11 फेब्रुवारीला चोरी झाल्याची माहिती मिळाली, मात्र त्यांनी 23 फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

नर्स आणि तिचा पतीला अटक
एका वृत्तसंस्थेनुसार, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवी दिल्ली जिल्ह्याच्या विशेष कर्मचारी शाखेच्या पथकासह मंगळवारी रात्री सरिता विहारमध्ये छापा टाकला. त्यांनी नर्स विल्सन आणि तिच्या पतीला अटक केली. दोघंही 31 वर्षांचे आहेत. चोरीचे दागिने आणि रोख रक्कम अद्याप सापडली नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.