मुंबई : 'शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी' या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा 'नवरदेव (Bsc Agri.)' हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. आज (ता. २३) राष्ट्रीय कृषीदिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. सध्या समाजात लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालंय, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो... त्यातही शेतकरी तरूण असेल तर विचारायलाच नको... पण शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे.
आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव BSc. Agri.’ या चित्रपटाचं टिजर रिलीज झालं आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील 'भेटणार कधी नवरदेवा नवरी' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं.
शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल.
आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.
काही दिवसांपुर्वी बैलगाडीतून चित्रपटाचे पोस्टर गाजतवाजत लॉन्च करण्यात आलं होतं. ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत या पोस्टरची आणि प्रमुख कलाकार क्षितीश यांची बैलगाडीतून मिरवणूक निघाली होती आणि पोस्टर लॉन्चचा कार्यक्रम संपन्न झाला होता. या कार्यक्रमात क्षितीश, प्रियदर्शिनी, गार्गी फुले, रमेश परदेशी, दिग्दर्शक राम खाटमोडे, निर्माते मिलिंद लडगे आदी मान्यवर उपस्थित होते. आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.