आई-मुलीच्या आंबटगोड नात्यावर भाष्य करणाऱ्या 'मायलेक'मधून एकत्र आल्या तीन पिढ्या!

या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक 'मायलेकी'ची जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे आणि ही जोडी म्हणजे सोनाली खरे आणि तिची आई कल्पिता खरे. 

Updated: Apr 18, 2024, 06:17 PM IST
आई-मुलीच्या आंबटगोड नात्यावर भाष्य करणाऱ्या 'मायलेक'मधून एकत्र आल्या तीन पिढ्या!  title=

मुंबई : आई-मुलीच्या आंबटगोड नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंद या खऱ्या आयुष्यातील 'मायलेक' या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहेत. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक 'मायलेकी'ची जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे आणि ही जोडी म्हणजे सोनाली खरे आणि तिची आई कल्पिता खरे. सोनाली खरे या चित्रपटाची निर्माती आहे तर कल्पिता खरे या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. त्यामुळे आता या तीन जनरेशन या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'मायलेक'ची आणखी एक खासियत म्हणजे या चित्रपटाच्या तांत्रिक बाबीही सगळ्या महिलांनी सांभाळल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे म्हणायला काहीच हरकत नाही. 

याबद्दल निर्माती, अभिनेत्री सोनाली खरे म्हणते, ''तीन जनरेशन्स एकत्र काम करत आहेत, हे खूप कमाल आहे. मुळात निर्माती म्हणून मी पदार्पण करत आहे, सनायाही 'मायलेक'मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय  आणि बऱ्याच वर्षांनी माझाही कमबॅक होत आहे, त्यात माझी आई सहनिर्माती म्हणून पहिल्यांदाच येत आहे. तर या सगळ्याच गोष्टी एकदम मस्त जुळून आल्या आहेत. रिअल लाईफ मायलेकी असल्याने रील लाईफ त्याचा नक्कीच फायदा झाला. त्या भावना, प्रेम, काळजी हे सहज व्यक्त करणे शक्य झाले.

 कॅमेरासमोर आम्ही सहकलाकार म्हणूनच होतो, कॅमेरा बाजूला झाला की माझ्यातली 'आई' जागृत व्हायची. परंतु माझी मुलगी आहे म्हणून नाही, परंतु सनायाने उत्तमरित्या तिची भूमिका साकारली आहे. हा महिलाप्रधान चित्रपट आहे, याबद्दल सांगायचे तर, एकदा असेच प्रियंकाशी बोलताना आमच्या लक्षात आले, की तांत्रिक बाबी सांभाळणारी बरीच टीम ही महिलांची आहे. मग आम्ही इतर गोष्टींसाठीही महिलांनीच निवड केली. त्यामुळे आमच्या चित्रपटाच्या प्रत्येक विभागाच्या प्रमुख या महिलाच आहेत. केवळ संगीत विभाग सोडून.'' 

ब्लुमिंग लोटस प्रॉडक्शन, सोनाली सराओगी प्रस्तुत, प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनाली आनंद निर्मित या चित्रपटाचे कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्माते आहेत. तर नितीन प्रकाश प्रकाश वैद्य 'मायलेक'चे असोसिएट प्रोड्युसर आहेत.