मुंबईत विजय देवराकोंडाला पाहताच मोठी गर्दी;  महिला चाहती बेशुद्ध

तेलुगु चित्रपट अभिनेता विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Updated: Aug 1, 2022, 05:41 PM IST
मुंबईत विजय देवराकोंडाला पाहताच मोठी गर्दी;  महिला चाहती बेशुद्ध title=

मुंबई : तेलुगु चित्रपट अभिनेता विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. ट्रेलर लॉन्चच्या वेळी विजय देवराकोंडाचा अनेक फूट उंच कटआउट बसवण्यात आला आणि त्याला दुधाने आंघोळ घालण्यात आली. 'लाइगर' सिनेमाला रिलीजला अजून बराच अवधी आहे आणि विशेषत: महिला चाहत्यांमध्ये या अभिनेत्याची क्रेझ वाढत आहे. नुकतंच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान असं काही घडलं आहे की, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा कार्यक्रम मध्यंतरी थांबवण्यात आला. याचं कारण महिला चाहते होते.

 को-स्टार अनन्या पांडेसह विजय देवरकोंडा 1 ऑगस्ट रोजी'लाइगर'च्या प्रमोशनसाठी नवी मुंबईतील एका मॉलमध्ये गेले होते. संपूर्ण मॉल खचाखच भरला होता. तिथे विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांना एका उपक्रमात भाग घ्यायचा होता. मात्र विजय देवरकोंडा स्टेजवर पोहोचताच गर्दीने गोंधळ उडाला.

लोक शिट्ट्या वाजवू लागले. दरम्यान त्याला पाहून एका महिला चाहतीची प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. तिची प्रकृती गुदमरल्यामुळे बिघडली असल्याचं सांगण्यात येत आहे. हे पाहून आयोजकांचीही अवस्था बिकट झाली. त्यांनी लगेचच त्या मुलींना प्रचंड गर्दीतून बाहेर काढलं. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओमध्ये लोकं बॅरिकेडवरून एका महिला फॅनला बाहेर काढताना दिसत आहेत. यानंतर तिला काहिजण जमिनीवर बसवात. दरम्यान, बॅरिकेड ढकलत मंचावर उपस्थित असलेल्या विजय देवरकोंडाच्या दिशेने चाहते सरकू लागले. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होणार होती. मात्र त्यानंतर परिस्थितीची जाणीव करून सुरक्षारक्षकांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांना कार्यक्रमाच्या मध्यभागी थांबवलं आणि काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा कार्यक्रम थांबवण्यास सांगितला.