'झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, 'ही' जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो

ही मालिका कधीपासून सुरु होणार, याची वेळ काय असणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Updated: Feb 15, 2024, 05:59 PM IST
'झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, 'ही' जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो title=

Zee Marathi New Serial : झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर 'शिवा', 'पारु' या नव्या मालिका सुरु झाल्या. त्यानंतर आता लवकरच अभिनेता राकेश बापटची प्रमुख भूमिका असलेली एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' असे या मालिकेचे नाव आहे. आता झी मराठी वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका सुरु होणार आहे. याचा प्रोमोही समोर आला आहे. 

झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' असे या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेतून अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर ही नवी कोरी जोडी झळकणार आहे. ही मालिका पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. ही मालिका झी टीव्हीवरील 'पुनर्विवाह-जिंदगी मिलेगी दोबारा' या हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे. 

पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित

या मालिकेच्या प्रोमोमध्ये आयुष्याचा जोडीदार गेल्यानंतर एकट्याने मुलांची जबाबदारी सांभाळणं किती कठीण असते, हे दाखवण्यात आले आहे. त्याबरोबरच त्या मुलांना आई किंवा वडील नसण्याची कमतरता भासते आणि त्यानंतर पुन्हा लग्नाचा विचार सुरु होतो, या विषयावर आधारित कथा या मालिकेत दाखवली जाणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाचा अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

झी मराठीने हा प्रोमो शेअर करत त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. "अपूर्ण ‘ती’ अपूर्ण ‘तो’ नव्या आयुष्याची वाट पाहे, आमच्या येथे लवकरच... ‘पुन्हा कर्तव्य आहे", असे झी मराठीने म्हटले आहे. झी मराठीच्या या प्रोमोवर अनेक कलाकारांनी अक्षयाला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री पूजा बिरारी, साक्षी गांधी, समृद्धी केळकर, तितिक्षा तावडे या कलाकारांनी तिला नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता विशाल निकमने "आई शप्पथ, जिंकलीस ग पोरी, खूप छान प्रोमो, खूप छान काम, तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. खूप खूप शुभेच्छा" अशी कमेंट केली आहे. 

दरम्यान अक्षय म्हात्रे हा हिंदी मालिकेत काम करत आहे. आता तो या मालिकेच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही मराठी मालिकांमध्ये झळकली होती. ती 'सरस्वती', 'साता जन्माच्या गाठी' आणि 'तुझ्या इश्काचा नाद खुळा' या मालिकांसाठी ओळखली जाते. या नव्या मालिकेत तिच्यासोबत वंदना सरदेसाई, पंकज चेंबूरकर, सुदेश म्हाशीलकर आणि रेयांश जुवाटकर हे कलाकारही झळकणार आहेत. ही मालिका कधीपासून सुरु होणार, याची वेळ काय असणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.