प्रेरणा कोरगांवकर, झी मीडिया, मुंबई : झी मराठीवरील अनेक मालिका या जणू प्रेक्षकांच्या रोजच्या दिनक्रमाचा एक भाग बनल्या आहेत. तुला पाहते रे, माझ्या नवऱ्याची बायको, लागिर झालं जी या आणि अशा अनेक मालिका प्रेक्षक न विसरता रोज पाहतात. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि प्रसंग हे अनेकदा प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात.
लागिरं झालं जी ही मालिका देखील अशीच काहीशी आहे. त्यातील अज्या आणि शीतलीची भूमिका ही आपलाचं अज्या आणि आपलीचं शीतली असं समोर ठेवून प्रेक्षक अनुभवत असतात. पण जेव्हा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते, तेव्हा मात्र प्रेक्षकांना वाईट वाटतं.
लागिरं झालं जी या मालिकेतील लष्करात असलेला अज्या आणि साधी सरळ शीतली. त्याच्यात उमलणारी हळुवार प्रेमकथा. अज्या शीतलीच्या या नात्याला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं. अज्या आणि शीतलीचा लग्नसोहळा असो. किंवा मग अज्या सीमेवर लढण्यासाठी जातानाचा प्रसंग असो. रसिकांनी या सर्वच गोष्टीं आपल्या घरातील प्रसंगाप्रमाणे अनुभवल्या
शिबानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मकदुम, निखिल चव्हाण या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग निर्माण होऊ लागला. या कलाकारांना पाहण्यासाठी साताऱ्याच्या चांदवडी गावात असलेल्या मालिकेच्या सेटवर लोकांची गर्दी होऊ लागली.
विशेष म्हणजे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना रोजगार मिळाला. अज्या शीतलीची स्टाईल, डायलॉग अनेकांना तोंडपाठ झाले होते..तरुणामध्ये तर अज्या आणि शीतलीचं जणू ट्रेन्डचं सुरु झालं होतं. आता अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. ही मालिका येत्या २२ जूनला प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. मालिकेचा शेवट कसा होणार याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पण आपल्या लाडक्या अज्या-शीतलीला प्रेक्षक मिस करतील हे मात्र नक्की.