संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण; जाणून घ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी...

जाणून घ्या या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी आणि त्यावरील उपचारांबाबत...

Updated: Aug 12, 2020, 03:14 PM IST
 संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण; जाणून घ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी... title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय दत्तला झालेला फुफ्फुसाचा कर्करोग अर्थात लंग कॅन्सर Lung Cancer तिसऱ्या स्टेजमध्ये Stage-3 असल्याचं बोललं जात आहे. जाणून घ्या या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी आणि त्यावरील उपचारांबाबत-

जेव्हा फुफ्फुसांच्या कोणत्याही भागात पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते, तेव्हा या स्थितीस फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचं मानलं जातं. सुरुवातीच्या काळात फुफ्फुसांच्या कर्करोगाचं निदान होत नाही आणि तो आत-आतपर्यंत वाढत जातो. कर्करोग अर्थात कॅन्सर हा असा एक आजार आहे, ज्यावर अद्याप पूर्ण इलाज किंवा उपचार आढळलेला नाही. फुफ्फुसांचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, परंतु आधुनिक वैद्यकीय, विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे या कर्करोगापासून मुक्त होणं, यातून बरं होणं आता शक्य झालं आहे. 

कॅन्सरचे प्रकार 

स्मॉल सेल लंग कॅन्सर (Small-cell carcinoma)

हा सर्वाधिक वेगाने वाढणारा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. हा कॅन्सर धुम्रपानामुळे होतो. हा एससीएलसी अर्थात स्मॉल सेल लंग कॅन्सर शरीराच्या विविध भागात पसरतो. आणि अनेकदा हा कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतरच त्याचं निदान होतं.

नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (Non-small cell lung cancer)

हा असा कॅन्सर आहे ज्याला तीन प्रकारांत विभागलं जातं. त्यांची नावं ट्यूमरमध्ये असलेल्या पेशींवर आधारित आहेत. एडिनोकार्सिनोमा, स्क्वेमस सेल कार्सिनोमा आणि लार्ज सेल कार्सिनोमा. याच्या तीन स्टेज असतात -

अर्ली स्टेज 

या स्टेजमध्ये कॅन्सरची सुरुवात होते. या काळात, शरीराच्या कोणत्याही एका भागामध्ये त्याच्या पेशी दोन ते चार पटीच्या अंदाजाने वाढू लागतात. या स्टेजमध्ये ऑपरेशन करुन एक फुफ्फुस किंवा तो भाग हटवला जाऊ शकतो, ज्या भागात कॅन्सरची लक्षण आढळली आहेत.

इंटरमीडिएट स्टेज

या स्टेजमध्ये, कॅन्सरच्या सेल्स अर्थात पेशी शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पसरु लागतात. या स्टेजमध्ये असताना किमोथेरेपी, रेडिओथेरेपीसह ऑपरेशन करणंही गरजेचं भासतं.

ऍडवान्स स्टेज 

या स्टेजमध्ये, कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागातही पूर्णपणे पसरु शकतात. या स्टेजमध्ये रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता कमी असते. परंतु ऍडवान्स किमोथेरेपीद्वारे अधिक काळापर्यंत उपचार सुरु राहू शकतात.

लंग कॅन्सरची लक्षणं -

श्वास घेण्यास त्रास होणं
वजन कमी होणं
सतत खोकला असणं
खोकल्याद्वारे होणाऱ्या कफचा रंग आणि त्याच्या प्रमाणात बदल होणं
खोकताना रक्त येणं
छातीत वारंवार संक्रमण होणं आणि छातीत सतत दुखत राहणं