Central Health Ministry : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रकरणांबाबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. हा चितेंचा विषय आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) प्रसारावर आरोग्य मंत्रालयाने दोन चांगल्या बातम्या देखील दिल्या आहेत. ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत जगात केवळ 115 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर भारतात फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
रुग्णांना डिस्चार्जच्या धोरणात बदल
आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्याच्या धोरणात बदल केला आहे. आता ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सात दिवसांनी डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. यादरम्यान, जर रुग्णाची प्रकृती सलग तीन दिवस ठीक राहिली आणि त्याला ताप आला नाही, तर डिस्चार्जसाठी चाचणी करण्याचीही आवश्यकता नाही.
मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आली आणि त्यांची ऑक्सिजन पातळी सलग तीन दिवस 93 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर अशा रुग्णांनाही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देत सह सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा खूप वेगाने पसरत आहे. असं असलं तरी दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, कॅनडा आणि डेन्मार्कमधील डेटानुसार डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याचा धोका कमी आहे.