8 वर्षीय चिमुकलीच्या मेंदूत 100 हून अधिक किडे !

लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. 

Updated: Jul 25, 2018, 12:10 PM IST
8 वर्षीय चिमुकलीच्या मेंदूत 100 हून  अधिक किडे !  title=

मुंबई : लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मुलांना नेहमीच्या भाजीच्या स्वरूपात भाज्या दिल्यास त्या मुलं खात नाहीत, म्हणून अनेकदा आई वेगवेगळ्या रेसिपींचा विचार करतात. तुम्ही देखील असेच काही प्रयोग करत असाल तर सावधान ! कारण कोबीच्या भाजीमुळे एका आठ वर्षीय चिमुकलीच्या मेंदूमध्ये 100 हून अधिक किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

तीव्र डोकेदुखी आणि आकडी (फीट)येण्याचा त्रास ! 

सहा महिने एक 8 वर्षांची चिमुकली सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगत होती. सुरूवातीला हा त्रास नेमका कशामुळे होतोय? हे समजत नव्हते मात्र गुडगावमधील डॉक्टरांनी चिमुकलीची तपासणी केल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये 100 हून अधिक कृमी आढळल्या. त्यामुळे डोक्यामध्ये छोटे छोटे क्लॉट आढळतात. 

डोकेदुखीच्या त्रासावर उपचार घेणार्‍या मुलीला स्टेरॉईड्स देण्यात आली. यामुळे या चिमुकलीचं वजन 40 वरून थेट 60 किलोवर गेले आहे. सिटीस्कॅन केल्यानंतर या चिमुकलीला न्यूरोसिस्टिसेरसोसिसचा त्रास असल्याचे निदान झाले आहे. कृमींच्या अंड्यांचा मेंदूवरील परिणामामुळे त्याचे काम मंदावले होते. 

मेंदूत अंड्यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आता डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. 

कशामुळे कृमी बनल्या इतक्या प्रभावशाली ? 

अस्वच्छतेमुळे टेपवॉर्म (कृमी) पोटात जातात. त्यानंतर रक्ताच्या माध्यमातून शरीरभर त्यांचा प्रभाव वाढतो. टेपवर्म हे एक पॅरासाईड आहेत. त्यांचे पोषण दुसर्‍यांवर अवलंबून असते. शरीरात त्यांची वाढ झपाट्याने होण्यास पोषक वातावरण असते. 

भारतामध्ये न्यूरोसिस्टिसेरसोसिस या आजाराच्या विळख्यात सुमारे 12 लाख लोकं आहेत. आकडी (फीट) येण्याच्या समस्येमागे हे एक कारण आहे. 

कृमींचा धोका कशामुळे वाढतो? 

प्रामुख्याने अर्ध कच्च शिजलेले मांस, मासे, पालेभाज्यांमधून कृमी शरीरात जातात.  

कोबी, पालक अशा भाज्या नीट न शिजवल्यास हे टेपवर्म शरीरात जातात. म्हणून पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं धोकादायक

अस्वच्छ पाणी, घाणेरड्या परिसरामध्ये उगवणार्‍या भाज्यांमुळे हा धोका अधिक बळावतो. 

कोणती काळजी घ्याल? 

स्वच्छता पाळणं हेच टेपवर्मपासून बचावण्याचा एक मार्ग आहे. यासाठी स्वच्छ पाणी, आहार आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. 

शौचालयातून आल्यानंतर हात धुताना नखंदेखील साफ करायला विसरू नका. 

मांसाहार करताना प्रामुख्याने काळजी घ्या.