देशात H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे 2 जणांचा बळी; केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

आणखी एका खतरनाक व्हायरसचा उद्रेक झालाय. हा आहे H3N2 एन्फ्लूएन्झा (H3N2 Influenza) व्हायरस आहे. रूग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh L. Mandaviya) यांनी आढावा बैठक घेतली.

Updated: Mar 10, 2023, 06:36 PM IST
देशात H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे 2 जणांचा बळी; केंद्र सरकार अलर्ट मोडवर! title=

H3N2 Influenza Death : कोरोनाची (Corona) साथ आटोक्यात येत नाही, तोच आता आणखी एका खतरनाक व्हायरसचा उद्रेक झालाय. हा आहे H3N2 एन्फ्लूएन्झा (H3N2 Influenza) व्हायरस आहे. देशभरात या फ्लूचे रुग्ण झपाट्यानं वाढतायत. कर्नाटक आणि हरयाणा या राज्यांमध्ये फ्लूनं दोन बळी देखील घेतलेत. शेकडो रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये रूग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh L. Mandaviya) यांनी आढावा बैठक घेतली.

यामध्ये विशेषतः गर्भवती महिला, 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये हा फ्लू झपाट्यानं पसरतोय. एवढंच नव्हे तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांमध्येही एन्फ्लूएन्झा संक्रमित होण्याचा धोका जास्त आहे.

दरम्यान या व्हायरसमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. यामध्ये कर्नाटक आणि हरियाणामध्ये  या व्हायरसमुळे प्रत्येकी 1-1 मृत्यू झाल्याची सरकारने पुष्टी केलीये. मात्र उर्वरित चार लोकांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या म्हणण्यानुसार, गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, H3N2 मुळे रूग्णालयात दाखल करणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

H3N2 व्हायरसची लक्षणे

  • खोकला, नाक वाहणे किंवा बंद होणे
  • गळ्यात खवखव, ताप
  • डोकेदुखी, अंगदुखी
  • थंडी वाजणे, थकवा

कसा पसरतो H3N2 व्हायरस ? 

  • H3N2 हा संक्रमित होणारा व्हायरस आहे
  • एका व्यक्तीच्या शरीरातून तो दुस-या व्यक्तीच्या शरीरात पसरतो
  • फ्लूची बाधा झालेली व्यक्ती शिंकली की त्याचे ड्रॉपलेट हवेत पसरतात
  • दुसरी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, गर्दीच्या ठिकाणी हा व्हायरस लवकर पसरतो

कोरोना आणि H3N2 मध्ये फरक काय ? 

  • कोरोना आणि H3N2ची बहुतेक लक्षणे सारखीच आहेत
  • कोरोनामुळं श्वसन मार्ग प्रभावित होतो
  • तर H3N2 मुळे नाक, गळा, डोळ्यांमध्ये जळजळ जाणवते
  • कोरोनाची सर्वत्र टेस्ट करता येते
  • तर H3N2 ची टेस्ट काही खासगी हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहे
  • त्यासाठी तब्बल 6 हजार रुपये खर्च होतो

गेल्या सहा महिन्यात फ्लूचे रुग्ण तब्बल २०० टक्क्यांनी वाढलेत. त्यामुळं देशात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलाय. फ्लू रोखण्यासाठी सरकारनं काही सूचनाही केल्यात. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हा सल्ला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. मास्क लावला नाही तर हा प्राणघातक फ्लू आपल्या जीवावरही बेतू शकतो.