दारूच्या दुकानात जायचं असेल तर आत लस घ्यावीच लागेल!

ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना बँकेत किंवा दारूच्या दुकानात जाऊ दिलं जाणार नाही, असा आदेश त्यांनी जारी केला आहे.

Updated: Dec 11, 2021, 12:45 PM IST
दारूच्या दुकानात जायचं असेल तर आत लस घ्यावीच लागेल! title=

मदुराई : तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देशात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना बँकेत किंवा दारूच्या दुकानात जाऊ दिलं जाणार नाही, असा आदेश त्यांनी जारी केला आहे. यासोबतच ज्यांना अद्याप लस मिळालेली नाही त्यांच्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मदुराईचे जिल्हाधिकारी अनिश शेखर यांनी एक आदेश जारी केला आहे की, ज्यांचं लसीकरण केलं जाणार नाही, त्यांना रेशन दुकाने, सुपरमार्केट, चित्रपटगृह, विवाह हॉल, शॉपिंग मॉल्स, कपड्यांची दुकाने, बँका आणि दारू यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

लसीकरणाबाबत असा आदेश निघण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबरमध्ये तमिळनाडूच्या निलगिरी प्रशासनानेही असाच आदेश जारी केला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी दिव्या यांनी आदेश जारी केला होता की, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच दारू दिली जाईल. यामुळे लसीकरणाला गती मिळेल, असा युक्तिवाद जिल्हाधिकाऱ्यांनी यामागे केला होता.

त्याचवेळी मध्य प्रदेशातील खांडवामध्येही असाच आदेश देण्यात आला होता. तिथल्या जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील त्यांनाच दारू दुकानावर मद्य मिळेल. यावेळी अधिकाऱ्याने जिल्ह्यातील सर्व दारू दुकानांना हे आदेश दिले होते. 

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील गोंदियातील जिल्हाधिकाऱ्यांनी खास आदेश दिले आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक खळबळ उडाली आहे. या आदेशानुसार, गोंदियामध्ये आता लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाहीये. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीमेला वेग मिळण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.