जागतिक सुरक्षित गर्भपात दिन : गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या

गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या

Updated: Sep 28, 2019, 04:20 PM IST
जागतिक सुरक्षित गर्भपात दिन : गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या title=
संग्रहित फोटो

मुंबई : आज (२८ सप्टेंबर) जागतिक सुरक्षित गर्भपात दिन (Safe Abortion Day)... एका महिलेसाठी गर्भपाताचा निर्णय घेणं कठिण आहे, परंतु, अद्ययावत औषधांमुळे गर्भपाताची प्रक्रियाही सोपी झाली आहे. गर्भ २० आठवड्यांचा होईपर्यंत गर्भपात करण्यासाठी भारतात कायद्याने मान्यता दिलेली आहे. ही मर्यादा २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी करणारं विधेयक संसदेत २०१४ पासून विधेयक प्रलंबित आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतात दर दोन तासांनी एका महिलेचा मृत्यू असुरक्षित गर्भपाताचं कारण ठरतं.

डॉक्टरांच्या निगरानीखाली गर्भपात करण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात... एक मेडिकल आणि दुसरी म्हणजे सर्जिकल... मेडिकल गर्भपात याद्वारे गोळी खाऊन गर्भपात केला जातो तर सर्जिकल गर्भपात करताना डॉक्टरांकडून गर्भ काढण्यात येतो. यातील कोणता पर्याय निवडावा हे गर्भावर अवलंबून असतं.

मेडिकल गर्भपाताबद्दल...  
मेडिकल गर्भपातावेळी गोळ्यांचा वापर केला जातो. या गोळ्यांद्वारे गर्भ अलगदरित्या गर्भाशयापासून वेगळा केला जातो.

सर्जिकल गर्भपाताबद्दल...
सर्जिकल गर्भपातामध्ये ५ ते १० मिनिटांच्या प्रक्रियेत गर्भाला गर्भाशापासून वॅक्युम सेक्शनद्वारे विलग केलं जातं. महिलेच्या एका गर्भपातानंतर पुन्हा गर्भवती होण्याच्या शक्यतेवर अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. पण अनुभवी डॉक्टरच्या निगरानीखाली गर्भपात केल्यास या धोक्याची शक्यता अतिशय कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गर्भपातावेळी शरीर अनेक गोष्टींना सामोरं गेलेलं असतं आणि दुसऱ्या गर्भासाठी त्याला आरामाची गरज असते. त्यामुळे गर्भपात केल्यानंतर एक आठवड्यापर्यंत शरीरसंबंध प्रस्थापित करू नये तसंच पुढचा एक महिन्यापर्यंत पुन्हा बाळासाठी योजना आखू नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.