गरम पाणी पिण्याचे असेही फायदे

गरम पाणी पिण्याचे फायदे...

Updated: Dec 6, 2019, 01:57 PM IST
गरम पाणी पिण्याचे असेही फायदे title=
संग्रहित फोटो

मुंबई : थंडीचे दिवस सुरु होत आहेत. बदलत्या ऋतूचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेजं आहे. या बदलत्या हवामानात गरम पाणी शरीरासाठी लाभदायक आहे. गरम पाणी पिण्याचे फायदे आहेत. पचनशक्ती, रक्ताभिसरण चांगलं राहण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांत गरम पाणी पिण्याने अधिक आरामदायी वाटू शकतं. 

सर्दी - खोकला 

गरम पाण्याची वाफ घेणं सर्दीवर चांगला उपाय आहे. यामुळे सायनस डोकेदुखीपासूनही आराम मिळू शकतो. सतत सर्दी-खोकला असल्यास गरम पाणी पिणं यावर रामबाण उपाय आहे. गरम पाण्याच्या गुळण्या केल्यानेही खोकला, घसादुखीपासून आराम मिळू शकतो. 

पचनशक्ती -

गरम पाणी पचनतंत्र सक्रिय ठेवण्यास मदत करतं. गरम पाणी पोट आणि आतड्यांमधून जातं, त्यावेळी पचनतंत्र हायड्रेटेड होतात आणि जमा झालेला कचरा बाहेर काढण्यास मदत होते. जेवणानंतर काही वेळाने गरम पाणी पिण्याची सवय लावल्यासही फायदा होतो. यामुळे जेवण लवकर पचतं आणि पोट हलकं राहण्यासही मदत होते. नकळतपणे काही चुकीचं खाल्यास त्याला बाहेर काढण्यासाठी गरम पाणी पचनतंत्राची मदत करु शकतं. 

केंद्रीय मज्जासंस्था -

कोमट पाणी पिण्याने केंद्रीय मज्जासंस्था शांत राहते. यामुळे स्ट्रेस लेवलही कमी होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना संधीवाताचा त्रास आहे त्यांनी केंद्रीय मज्जासंस्था शांत ठेवण्यासाठी गरम पाणी पिण्याने अतिरिक्त फायदा होऊ शकतो.

बद्धकोष्ठता - 

कोमट पाणी पिण्यामुळे आतडे संकुचित होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमधे अडकलेला जुना कचरा आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. रोज कोमट पाणी पिण्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. 

हायड्रेटेड -

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी गरम पाणी अतिशय लाभदायक आहे. अनेकदा डॉक्टारांकडून एक व्यक्तीला कमीत-कमी आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. अनेकदा  आपल्याकडून इतकं पाणी प्यायलं जात नाही. त्यामुळे संपूर्ण वेळ कोमट पाणी पित नसल्यास, दिवसाच्या सुरुवातीला एक ग्लास गरम पाणी आणि रात्री झोपताना एक ग्लास गरम पाणी पिण्याने काही प्रमाणात हायड्रेटेड राहण्यास मदत होते. 

वजन कमी करण्यास मदत - 

वजन सतत वाढत असल्यास गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून तीन महिन्यांपर्यंत पिण्याने फायदा होऊ शकतो. जर हे पाणी प्यायचे नसल्यास, जेवणानंतर एक ग्लास गरम पाणी पिणं फायद्याचं ठरेल. 

ताण-तणाव 

गरम पाणी पिण्याने केंद्रीय मज्जासंस्था सुरळित काम करते. त्यामुळे गरम पाण्यामुळे ताण-तणाव कमी जाणवू शकतो.