बाबा रामदेव यांना मोठा दणका, आता 'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी

पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे.  

Updated: Jun 25, 2020, 10:55 AM IST
बाबा रामदेव यांना मोठा दणका, आता 'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी title=
ANI Photo

मुंबई : कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केलेचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर 'कोरोनिल'  हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे. त्याआधी या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी होती.

कोरोनावर अद्याप अधिकृतपणे औषध उपलब्ध नाही. असे असतानाच पंतजलीने कोरोनावर 'कोरोनिल'  हे औषध असल्याचा दावा केला. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे, बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचं क्लिनिकल ट्रायल करण्यात आले होते की नाही, याचा शोध घेणार आहे, असे ते म्हणालेत.  त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, आयुष मंत्रालयाकडून या औषधाची चौकशीही करण्यात येत आहे. कुणी कोरोनाच्या नावावर औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करु शकत नाही, असे केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत. कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून कोणीही कोणत्याही औषधांचा दावा करुन त्या औषधांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे राजस्थान सरकारने या आधीच स्पष्ट केल्याने कोरोनिल औषध आता संकटात सापडले आहे.

तसेच या आधी आयुष मंत्रालयानेही बाबा रामदेव यांच्या या औषधावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. तसेच बाबा रामदेव यांच्या या औषधाच्या जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली होती.